Virat Kohli Team India Batting, IND vs SL: भारतीय संघाची श्रीलंका विरूद्धची वनडे मालिका फारच वाईट सुरु आहे. पहिल्या सामन्यात भारताला २३० धावांचा पाठलाग करता आला नाही. तर दुसऱ्या सामन्यात २४१ धावांचे आव्हान पार करताना भारतीय संघ २०८ धावांतच गारद झाला. या दोनही सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने निराशा केली. विराटने पहिल्या वनडे सामन्यात ३२ चेंडूत २४ धावा केल्या. त्यात केवळ २ चौकारांचा समावेश होता. वानिंदू हसरंगाने त्याला पायचीत केले होते. तर दुसऱ्या सामन्यातही विराट पायचीत झाला. १९ चेंडूत १४ धावा केल्यानंतर जेफ्री वँडरसेने त्याला बाद केले. या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने विराटवर टीका केली.
"विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. तो अव्वल दर्जाचा फलंदाज यात या कुणाचेही दुमत असू शकत नाही. असा फलंदाज सलग दोन सामन्यांमध्ये पायचीत (LBW) होतो ही गोष्ट अनाकलनीय आहे. श्रेयस अय्यर किंवा शिबम दुबेच्या बाबतीत असं काही झालं असतं तर समजू शकलो असतो. पण विराट कोहली हा महान फलंदाज आहे. विराटसारखा फलंदाज जर अशा पद्धतीने पायचीत होत असेल तर याचा अर्थ त्याचा सराव कमी पडतोय," असं रोखठोक विधान पाकिस्तानचे माजी क्रिकेटर बासित अली यांनी केले.
"भारतीय संघाची बॅटिंग लाइन अप ही जगातील सर्वोत्तम बॅटिंग लाइन अप मानली जाते. पण सध्या श्रीलंकेत जे काही सुरु आहे, ते पाहता ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम बॅटिंग लाइन अप किंवा फलंदाजी अजिबातच वाटत नाही. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांनीही पुरेसा सराव केलेला नाही असे मला त्यांच्या खेळावरून वाटते. ते दोघेही श्रीलंकेत सराव न करताच आलेत असं वाटतं," असेही बासित अली म्हणाले.
दरम्यान, भारताने पहिला सामना बरोबरीत सोडवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना केला. २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित-गिल जोडीने संघाला ९७ धावांची भक्कम सलामी मिळवून दिली होती. पण त्यानंतर अवघ्या काही वेळातच भारताने ६ गडी गमावले आणि सामन्यावरील पकड गमावली. जेफ्री वँडरसेने १० षटकात केवळ ३३ धावा देत ६ बळी घेतले आणि सामना फिरवला.