नवी दिल्ली : विराट बाद झाल्यानंतर पाकचा कर्णधार बाबर आझमने विराटसोबतचा फोटो ट्वीट केला. टी-२० विश्वचषकाच्या सामन्यादरम्यानच्या या फोटोमध्ये कोहली आणि बाबर आझम एकत्र चालताना दिसत आहेत. या फोटोला बाबारने एक सुंदर कॅप्शन दिले. विराटला पाठिंबा देण्यासाठी बाबरने, ‘ही वेळही निघून जाईल, खंबीर राहा,’ असा संदेश देत विराटची बाजू घेतली. कोहलीने यंदा सात वनडे खेळले. त्यात केवळ दोन अर्धशतकांसह १५८ धावा केल्या.
सध्या मोठ्या टीकेचा धनी ठरत असलेल्या विराटचा बचाव करताना बाबर म्हणाला, ‘मला वाटते की सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी विराटला मजबूत पाठिंबा द्यायला हवा. कारकिर्दीत अशा काळातून जाण्याच्या वेदना काय असतात, याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच मला वाटते की सर्वांनी विराटला साथ द्यायला हवी.’
श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला बाबर आझमने पत्रकारांशी संवाद साधताना विराट कोहलीबाबत भाष्य केले. तो पुढे म्हणाला, ‘क्रिकेटमधल्या बॅॅड पॅच या प्रकाराची मला पूर्ण कल्पना असल्याने मी विराटला समर्थन देणारे ट्वीट केले. कारण या काळात खेळाडूला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच टीकाकारांमुळे तुम्ही आधीच हैराण झालेले असता; पण मला वाटते की विराट यातून लवकर बाहेर पडेल. तसेच कोण सध्या त्याच्यावर काय टीका करते आहे याचा त्याला नक्कीच काही फरक पडत नसेल.’
बाबरव्यतिरिक्त इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनेही विराटला पाठिंबा दिला होता. कोहली जगातल्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहे. शिवाय तो पण एक माणूस आहे. एक मोठी खेळी त्याला फॉर्ममध्ये आणण्यात पुरेशी आहे, असे बटलर म्हणाला होता.