Join us  

Babar Azam: "ही वेळही निघून जाईल, खंबीर राहा", बाबर आझमच्या मदतीला अमित मिश्रा आला धावून 

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 4:37 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलॅंड्सचा पराभव करून विश्वचषकातील आव्हान कायम ठेवले आहे. खरं तर आजचा सामना पाकिस्तानसाठी करा किंवा मरा असा होता. कारण बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानने सलामीचे दोन्हीही सामने गमावले होते. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती, तर दुसऱ्या सामन्यात नवख्या झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला होता. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे.  दरम्यान, पाकिस्तानने आतापर्यंत विश्वचषकात भारत, झिम्बाब्वे आणि नेदरलॅंड्स यांच्याविरूद्ध सामने खेळले आहेत. मात्र कर्णधार बाबर आझमला एकाही सामन्यात दुहेरी धावसंख्या करता आली नाही. बाबर सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. अशातच पाकिस्तानचे माजी खेळाडू त्याच्यावर सडकून टीका करत आहेत. पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू कामरान अकमलने तर बाबरला कर्णधार पदावरून पायउतार करण्याची मागणी केली आहे. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू अमित मिश्रा बाबर आझमच्या मदतीला धावून आला आहे. बाबरने मागील तीन डावांमध्ये ० (१), ४ (९) आणि ४ (५) अशा धावा केल्या आहेत. 

खरं तर विश्वचषकातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये बाबरने केवळ ८ धावा केल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे माजी खेळाडू संघासह त्याच्यावर टीका करत आहेत. अशातच अमित मिश्राने बाबरला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. "ही वेळही निघून जाईल, खंबीर राहा", अशा आशयाचे ट्विट करून अमित मिश्राने बाबर आझमच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. 

पाकिस्तानने उघडले विजयाचे खातेपाकिस्तानने रविवारी झालेल्या सामन्यात नेदरलॅंड्सचा पराभव करून विजयाचे खाते उघडले आहे. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाने नेदरलॅंड्सविरूद्ध 'करा किंवा मरा' असा सामना खेळला. ज्यात पाकिस्तानने विजय मिळवून विश्वचषखातील विजयाचे खाते उघडले आहे.  नेदरलॅंड्स २० षटकांत ९ बाद केवळ ९१ धावा करू शकला होता. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक ३ बळी पटकावून प्रतिस्पर्धी संघाची कंबर मोडली. त्याच्यापाठोपाठ मोहम्मद वसीमने २ बळी घेऊन नेदरलॅंड्सला शंभरचाही आकडा गाठू दिला नाही. अखेर नेदरलॅंड्सने पाकिस्तानसमोर विजयासाठी ९२ धावांचे सोपे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने ८ गडी गमावून सहज विजय मिळवला. 

पाकिस्तानसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. कारण आजच्या सामन्यातील विजयामुळे पाकिस्तानचा संघ विश्वचषकात जिवंत राहिला आहे. याशिवाय आज होणारा भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना पाकिस्तानसाठी निर्णायक असणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले तर शेजाऱ्यांचे विश्वचषकातील आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहते भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानबाबर आजमभारतीय क्रिकेट संघ
Open in App