नवी दिल्ली : सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यासाठी आयपीएल-२०२३ हे खेळाडू या नात्याने अखेरचे आयपीएल ठरावे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने शुक्रवारी व्यक्त केले. धोनी २००८ पासूनच सीएसकेचे नेतृत्व करीत आहे. या दरम्यान त्याने चारवेळा संघाला जेतेपद पटकवून दिले. हेडन म्हणाला, ‘सीएसकेने यश मिळविण्यासाठी विशेष आणि आगळ्यावेगळ्या खेळाचा अवलंब केला. त्यात ते यशस्वीही ठरले. दोन वर्षे लीगमधून बाहेर राहणे दुर्दैवी म्हणावे लागेल. त्यानंतरही पुनरागमन करीत त्यांनी जेतेपदावर आश्चर्यकारकरीत्या नाव कोरले. धोनीने संघाला पुन्हा बलाढ्य बनविणे, खेळात सुधारणा घडवून आणणे आणि वेगळे रूप देणे, वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल. या संघाने अनेक खेळाडूंना रिटेन केल्यामुळे मोजक्या खेळाडूंवर हा संघ विसंबून असतो, असा ठपकादेखील लागला.’
हेडनच्या मते धोनीसाठी हे वर्ष विशेष असेल. याचा जल्लोष तितकाच शानदार होऊ शकतो. धोनी युगाची ही अखेर असू शकेल. माही आपल्या चाहत्यांसाठी विशिष्ट शैलीत खेळून त्यांचा निरोप घेऊ शकतो.’ ‘कोविडनंतर देशातील अनेक स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळले जातील.
चेपॉकवर सीएसकेचा सराव धडाक्यात सुरू आहे. चेपॉकवर ‘येलो आर्मी’ची उपस्थिती पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. खेळाडू म्हणून धोनी यंदा अखेरचे सामने खेळू शकतो. चाहत्यांना ‘गुड बाय’ करताना माहीने धावांचा पाऊस पाडावा, अशी प्रत्येक चाहत्यांची इच्छा असेल. देशाला दोनदा विश्वचषक जिंकून देणाऱ्या या महान, शांतचित्त आणि सुस्वभावी खेळाडूला निरोप देण्याचा क्षण आता जवळ आला आहे. हा क्षण अविस्मरणीय असाच असेल,’ असे हेडनने म्हटले आहे.
धोनीने पाडला षटकारांचा पाऊस!चेन्नई : आयपीएल २०२३ चे पर्व ३१ मार्चपासून सुरू होत आहे. यासाठी सर्वच संघांनी आपापल्या तयारीला वेग दिला आहे. चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात सर्वांत आधी तयारी सुरू केली. सध्या सीएसके संघ होम पीचवर अर्थात चेपॉक स्टेडियमवर सराव सत्रात व्यस्त आहे. सरावात एमएसदेखील अन्य सहकाऱ्यांसोबत घाम गाळताना दिसतो. मागच्या शनिवारी धोनी हरात दाखल झाल्यापासून सरावाला लागला. शुक्रवारी या अनुभवी यष्टिरक्षक- फलंदाजाने नेटमध्ये फलंदाजी सरावाच्यावेळी अनेक उत्तुंग षटकार खेचले. माहीने इतकी फटकेबाजी केली की चेंडूदेखील पुरता उखडून गेला. सीएसकेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. माहीचे फलंदाजीदरम्यानचे रूप पाहून अनेक चाहते सुखावले.
आयपीएलमधील अन्य कुठल्याही फ्रॅन्चायजीला सीएसकेसारखे फॅन फॉलोईंग लाभू शकले नाहीत. त्यामागील कारणही तसेच आहे. अन्य संघांकडे धोनीइतका लोकप्रिय चेहरा नाही. धोनी यंदा अखेरचे आयपीएल खेळेल, असा अंदाज व्यक्त होत असताना सीएसकेचे चाहते आपल्या लाडक्या ‘थाला’ची दणकेबाज फटकेबाजी आणि हेलिकॉफ्टर शॉटचा आनंद घेण्यास उत्सुक दिसतात.