भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वादामुळे Asia Cup 2023 होणार की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. बीसीसीआयने पाकिस्तानात आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाला पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ( PCB) हायब्रिड मॉडेल म्हणजेच भारताचे सामने तटस्थ ठिकाणी आणि उर्वरित स्पर्धा पाकिस्तानात हा पर्याय ठेवला. त्यालाही बीसीसीआयचा विरोध असल्याने वाद चिघळला. त्यानंतर पाकिस्तानने भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्काराची पोकळ धमकी दिली. आशिया चषक २०२३ स्पर्धेचा निर्णय अद्याप झालेला नाही आणि PCB ने सुधारित मॉडेल जाहीर केलय, त्यामुळे येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. अशात या वादात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi ) याने उडी घेतलीय.
आशिया चषक स्पर्धेवरून तणावाचं वातावरण असताना भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या स्थळावरूनही वाद होण्याची चिन्हे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार IND vs PAK सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे, परंतु PCB चे तेथे खेळण्यास विरोध आहे. त्यात आशिया चषक पाकिस्तानात न झाल्यास आम्हीही भारतात वर्ल्ड कप स्पर्धेसाठी येणार नाही, अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे. २०२५ची चॅम्पियन्स ट्रॉफीही पाकिस्तानात होणार आहे आणि PCB च्या पवित्र्याचा त्याच्यावरही परिणाम होऊ शकतो.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आशिया चषक आणि वन डे वर्ल्ड कप या दोन्ही स्पर्धांबाबत भारत-पाकिस्तानमधील गोंधळावर मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की पीसीबीने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला भारतात पाठवावे कारण त्याने आपल्याकडून सकारात्मक संदेश जाईल. ''पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा दौरा करावा. यामुळे पाकिस्तान क्रिकेटला सपोर्ट करत असल्याचा सकारात्मक संदेश जाईल," असे आफ्रिदी म्हणाला.
आफ्रिदीने आशिया चषक स्पर्धेच्या ठिकाणाबाबतही आपली भूमिका मांडली. ''आशिया चषक पाकिस्तानात झाला पाहिजे. क्रिकेट आणि राजकारण वेगळे ठेवावे, असे मला वाटते. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम निर्णयाच्या संदर्भात आणखी विलंब होऊ नये,” तो पुढे म्हणाला. या वर्षी सप्टेंबरमध्ये खेळल्या जाणार्या आशिया कपसाठी भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एकाच गटात आहेत. दरम्यान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांना दुसऱ्या गटात स्थान देण्यात आले आहे.