नवी दिल्ली :आयपीएल २०२२चा अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री आठ वाजेपासून सुरू होईल. फायनलआधी आयोजित होणाऱ्या सांस्कृतिक समारोप सोहळ्यात अनेक बॉलिवूड दिग्गज दिमाखदार कार्यक्रमांची मेजवानी सादर करतील.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६.३० पासून सुरू होईल. ५० मिनिटे चालणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूडचे कोण दिग्गज सहभागी होतील, हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले. कार्यक्रमानंतर सायंकाळी ७.३० ला नाणेफेक होईल.
आयपीएल उद्घाटनाला आणि समारोपाच्यावेळी बॉलिवूड तडक्याची परंपरा आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने तीन वर्षे सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी घातली होती. कोरोनामुळे २०२० आणि २०२१ च्या सत्रातही सांस्कृतिक सोहळा होऊ शकला नव्हता. यंदा आयपीएल २६ मार्चला सुरू झाले तेव्हा उद्घाटन सोहळा होऊ शकला नव्हता. नंतर आयपीएल परिषदेने समारोप सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
प्ले ऑफचे वेळापत्रक
क्वालिफायर-१ : २४ मे, सायं. ७.३० पासून (कोलकाता)एलिमिनेटर : २५ मे, सायं. ७.३० पासून (कोलकाता)क्वालिफायर-२ : २७ मे, सायं. ७.३० पासून (अहमदाबाद)फायनल : २९ मे, रात्री ८ वाजेपासून (अहमदाबाद )
पुढच्या सत्रापासून सामन्यांच्या वेळा बदलणार
आयपीएल २०२३ च्या सत्रात सामन्यांच्या वेळा बदलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. पुढच्या वर्षी सामने दुपारी ४ आणि रात्री आठ वाजेपासून सुरू होतील. सध्याच्या वेळा दुपारी ३.३० आणि सायंकाळी ७.३० अशा आहेत. वृत्तानुसार बीसीसीआयने प्रसारण हक्कात सहभागी असलेल्यांना सामन्यांच्या वेळा अर्ध्या तासाने वाढविण्यात येतील, असे पत्रकाद्वारे कळविले आहे. पुढच्या सत्रात दुपारच्या सामन्याची नाणेफेक ३.३० ला तर रात्रीच्या सामन्याची नाणेफेक आता सायंकाळी ७.३० ला होईल.
डबल हेडर कमी होणार?
दहा वर्षांपूर्वी २००८ ते २०१७ या काळात आयपीएल सामने नेहमी दुपारी चार आणि रात्री आठ वाजेपासून सुरू व्हायचे. दरम्यान क्रिकबजच्या वृत्तानुसार बोर्ड पुढील सत्रात डबल हेडरची संख्या(एकाच दिवशी दोन सामने) कमी करण्याच्या विचारात आहे.
मीडिया हक्कासाठी जूनमध्ये लिलाव
२०२३-२०२७ या कालावधीसाठी मीडिया हक्काचा लिलाव १२ आणि १३ जून रोजी होईल. यासाठी सात कंपन्या स्पर्धेत आहेत. बीसीसीआयला लिलावातून ५४ हजार कोटी रुपयांची कमाई अपेक्षित आहे. स्टार स्पोर्ट्सने २०१८-२०२२ च्या मीडिया हक्कासाठी बीसीसीआयला १६.३४७ कोटी रुपये मोजले होते.