मुंबई : भारताने २०११ मध्ये आपल्याच यजमानपदाखाली आयोजित वनडे विश्वचषक जिंकला होता. वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयी षट्कार चाहत्यांच्या अजूनही लक्षात आहे. धोनीने मारलेल्या विजयी षट्काराचा चेंडू ज्या खुर्च्यांवर पडला होता, आता त्या खुर्च्यांचा लिलाव होणार आहे. अंतिम सामन्यातील ४९ वे षटक नुवान कुलसेकरा याने टाकले. षटकातील दुसऱ्याच चेंडूवर धोनीने त्याच्याच शैलीत षट्कार ठोकला. धोनीच्या षट्काराचा चेंडू ज्या दोन खुर्च्यांवर पडला, त्यांना ‘२०११ वर्ल्ड कप मेमोरियल सीट्स’ म्हणतात. यंदा होणाऱ्या वर्ल्डकपसाठी त्या खुर्च्यांचा लिलाव करणार असल्याची माहिती एमसीएच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. जे लोक लिलाव जिंकतील त्यांना विशेष आदरातिथ्य पॅकेज दिले जाईल. दोन खुर्च्यांची किंमत कोट्यवधीपर्यंत पोहोचू शकते.
एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी सांगितले की, खुर्च्यांवर कोणतेही स्मारक होणार नाही. या सीट्स धोनीच्या नावाने डिझाइन केल्या जातील आणि कायम धोनी सीट्स म्हणून ओळखले जातील. या सीट्स सुशोभित करण्यात येणार असून या जागा सोफ्यासारख्या असतील. या सीटसाठी तुम्हाला खूप पैसे मोजावे लागतील. पुढील दहा दिवसांत लिलाव होईल. विश्वचषक २०२३ साठी एमसीए तेंडुलकर स्टँडच्या लेव्हल डीच्या ३०० सीट्स ३ कोटी रुपयांना विकत आहे. तसेच सात बॉक्सच्या १४० सीट्स २.६६ कोटी रुपयांना विकणार आहे. विश्वचषकाचे पाच सामने मुंबईतील वानखेडे येथे होणार आहेत. गेल्या वेळी अंतिम सामना वानखेडेवर खेळला गेला होता.
Web Title: Those chairs will be auctioned!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.