मुंबई - भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. ४१ वर्षीय हरभजन सिंगने अनेक अविस्मरणीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान, निवृत्तीची घोषणा करताना हरभजन सिंगने नवी सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत. तो कुठल्याही आयपीएल संघामध्ये प्रशिक्षक वर्गातीस सदस्य म्हणून जोडला जाण्याची शक्यता आहे. तसेच हरभजन सिंग हा निवडणूक लढवणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याबाबत त्याने काहीही माहिती जाहीर केलेली नाही. भज्जीने भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले होते. दरम्यान, त्यातील तीन अविस्मरणीय क्षणांचा त्याने उल्लेख केला आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिकसह मालिकेत ३२ बळी, त्याशिवाय २००७ आणि २०११ च्या विश्वचषकातील भारतीय संघाच्या विजयांचा समावेश आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००१ मध्ये झालेली कसोटी मालिका ही क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेत भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला होता. या मालिकेमध्ये हरभजन सिंगने भेदक गोलंदाजी करताना एकूण ३२ बळी मिळवले होते. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने पुनरागमन केले होते. त्यामधील कोलकाता कसोटीत भारताने फॉलोऑन नंतर विजय मिळवला होता. या सामन्यात हरभजन सिंगने हॅटट्रिक घेतली होती. निवृत्ती घेताना हरभजन सिंगने सांगितले की, कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणार मी भारताचा पहिला गोलंदाज बनलो होतो. त्यामुळे मी हा क्षण विसरू शकत नाही.
हरभजन सिंगने हॅटट्रिक घेताना रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्नला बाद केले होते. त्याशिवाय २००७ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून मिळवलेले विश्वविजेतेपद आणि २०११ च्या विश्वचषकात श्रीलंकेला नमवून मिळवलेले विजेतेपद हेही आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्याचे भज्जीने सांगितले.