- मतीन खान(स्पोर्ट्स हेड - सहायक उपाध्यक्षलोकमत पत्रसमूह)
महिलांच्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवत भारताने इतिहास रचला. या संपूर्ण विश्वचषकात भारताने केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावला होता. मात्र अंतिम सामना एकतर्फी झाला. विश्वविजयाचा पाया रचण्यात तीन महिला खेळाडूंचा वाटा लाखमोलाचा होता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले आणि देशाला विश्वचषक विजयाची भेट दिली. एक नजर या तीन खेळाडूंवर...
फिरकीपटू अर्चना देवीने ग्रे स्क्रिवेन्स आणि नियाह हॉलंडला बाद करीत भारतीला अंतिम सामन्यात शानदार सुरुवात करून दिली. मात्र खरी मजा तर तेव्हा आली जेव्हा तिने रियना मॅक्डोनाल्डचा झेल पकडला. या भन्नाट झेलने ती एका रात्रीत भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनली. रतई पुरवा जिल्हा उन्नाव (उत्तर प्रदेश) येथे राहणारी १८ वर्षांच्या या गुणी खेळाडूचा क्रिकेटचा प्रवास एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे. लहान असताना कॅन्सरमुळे वडील गेले. त्यानंतर मोठा भाऊ बुधिमानसोबत ती क्रिकेटचा सराव करायची. एकदा दोघे बहीण भाऊ क्रिकेट खेळत असताना चेंडू कचरा असलेल्या खोलीत गेला. तो आणायला अर्चनाचा भाऊ गेला आणि त्याला साप चावला. दुर्दैवाने यात बुधिमान मृत्युमुखी पडला. पण जाता जाता त्याने आईला सांगितले की, काहीही झाले तरी अर्चनाची कारकीर्द क्रिकेटमध्ये घडव. या दोन धक्क्यानंतर समाजाची सांत्वना मिळेल अशी अर्चनाची आई सावित्रीदेवींना अपेक्षा होती. पण झाले उलटेच लोकांनी टोमणे मारून मारून त्यांचे जगणे मुश्कील केले. डायन या नावाने गावकरी त्यांना हाक मारू लागले. पण सावित्रीदेवी खचल्या नाहीत. त्यांनी लेकीला क्रिकेटपटू बनविण्याचा चंग बांधला होता. नातेवाइकांनीही त्यांना याबाबत दुशने दिली. सावित्रीदेवींनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि अर्चनाला ३४५ किलोमीटर दूर मुराबादला कस्तुरबा गांधी निवासी मुलींच्या शाळेत घातले. यानंतर तर समाज आणि नातेवाइकांकडून होणारा सावित्रीबाईंचा छळ अजूनच वाढला. पण आज अर्चनाच्या देदीप्यमान यशानंतर गरळ ओकणाऱ्या तोंडामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सोनम यादव : काच फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मजुराची मुलगीसोनम यादवनेही अंतिम सामना गाजवला. एका षटकांत केवळ तीन धावा देत तीन इंग्लंडच्या महत्त्वपूर्ण खेळाडूला बाद केले. तिच्या घरची आर्थिक स्थितीसुद्धा हलाखीचीच. वडील फिरोजाबादच्या काच फॅक्टरीमध्ये काम करणारे मजूर. घरात साधा टीव्हीसुद्धा नाही. अंतिम सामना बघण्यासाठी कुटुंबाने टीव्ही भाड्याने आणला होता. मात्र संपूर्ण कुटुंबाचा हा संघर्ष आज फळाला आला आहे.
वडिलांच्या त्यागातून निखरली तृषा गोंगाडीची कारकीर्दअंतिम सामन्यात मोक्याच्या क्षणी तृषा गोंगाडीने महत्त्वपूर्ण २४ धावा केल्या. या मुलीचा प्रवाससुद्धा रोमांचक आहे. आपल्या लेकीला क्रिकेटपटू म्हणून घडविण्यासाठी तृषाच्या वडिलांनी जिम आणि नोकरी दोन्हीचा त्याग केला आणि संपूर्ण लक्ष तृषाच्या जडणघडणीत घातले. तृषानेही वडिलांना निराश केले नाही. भारताचे भविष्य म्हणून तिच्याकडे आतापासून पाहिले जात आहे.आता तुम्हाला अंदाज आला असेल की, हा विश्वचषक किती बलिदान आणि अथक परिश्रमानंतर भारताच्या वाट्याला आला. विश्वविजयाच्या या प्रवासात त्या लोकांचे हात लागलेले आहेत ज्यांना समाजाने कमकुवत समजले होते, वाळीत टाकले होते. मात्र भविष्यात हे दु:ख कुठल्याच उदयोन्मुख खेळाडूच्या वाट्याला येऊ नये. कारण कितीही त्रास दिला तरी सच्चा खेळाडू हा स्वत:वरच्या विश्वासाने आणि दुर्दम्य आशावादाने गगनभरारी घेत असतो.