IPL Media Rights वर हजारो कोटींचा डाव; ५ वर्षांच्या प्रसारण हक्कांसाठी आज लिलाव, नेमकी प्रक्रिया काय?

संपूर्ण क्रिकेटची परिभाषा बदलणारी स्पर्धा म्हणून आयपीएलकडे बघितले जाते. फुटबॉलमधील क्लब कल्चरच्या धर्तीवर आयपीएलची सुरुवात झाली आणि अल्पावधीत या स्पर्धेने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 08:21 AM2022-06-12T08:21:08+5:302022-06-12T08:21:46+5:30

whatsapp join usJoin us
Thousands of crores on IPL Media Rights Auction today for 5 years broadcasting rights what exactly is the procedure | IPL Media Rights वर हजारो कोटींचा डाव; ५ वर्षांच्या प्रसारण हक्कांसाठी आज लिलाव, नेमकी प्रक्रिया काय?

IPL Media Rights वर हजारो कोटींचा डाव; ५ वर्षांच्या प्रसारण हक्कांसाठी आज लिलाव, नेमकी प्रक्रिया काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली :

संपूर्ण क्रिकेटची परिभाषा बदलणारी स्पर्धा म्हणून आयपीएलकडे बघितले जाते. फुटबॉलमधील क्लब कल्चरच्या धर्तीवर आयपीएलची सुरुवात झाली आणि अल्पावधीत या स्पर्धेने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. 

त्यामुळे साहजिकच बड्या उद्योगपतींच्या नजरा इकडे वळल्याने आयपीएलमध्ये पैशांचा पाट वाहू लागला. पर्यायाने या स्पर्धेचे प्रसारण हक्क मिळवून भरघोस नफा कमविण्यासाठी अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये चढाओढ लागली. पहिल्या १० वर्षांसाठी सोनीकडे या स्पर्धेचे प्रसारण हक्क होते आणि त्यानंतर स्टारकडे. मात्र आता २०२३ ते २०२७ या ५ वर्षांच्या कालवधीसाठी आज पुन्हा या प्रसारण हक्कांचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे आणि हा ई-लिलाव असेल. अनेक दिग्गज शर्यतीत असल्याने स्पर्धाही तगडी राहणार आहे. कोटींच्या उड्डाणांमुळे विक्रमी बोलीही लागू शकते. मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा एक प्रेक्षक म्हणून आपल्याला जरी होणार नसला तरी बीसीसीआयने आयोजित केलेली लिलावाची ही संपूर्ण कहाणी कशी असेल हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे लोकमतचे कन्सल्टिंग एडिटर अयाज मेमन यांनी...

बीसीसीआयचे चार विशेष पॅकेज कोणकोणते?
यावेळी प्रसारण हक्काचे वर्गीकरण बीसीसीआयने चार गटांमध्ये केलेले आहे. ज्यात प्रत्येक सत्रातील ७४ सामन्यांचा समावेश असेल. मात्र हे सामने प्रसारित करण्याची माध्यमं वेगवेगळी असतील. शिवाय २०२६ आणि २०२७ च्या सत्रासाठी बीसीसीआय सामन्यांची संख्या ९४ पर्यंत नेण्याच्या विचारात आहे.

पॅकेज ‘ए’: भारतीय उपखंडासाठी टीव्ही प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ४९ कोटी
पॅकेज ‘बी’: भारतीय उपखंडासाठी डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३३ कोटी
पॅकेज ‘सी’: प्रत्येक सत्रात १८ निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ११ कोटी
पॅकेज ‘डी’: भारतीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३ कोटी


लिलावाचा पूर्वार्ध
२००८ साली जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली तेव्हा क्लोजिंग बीडद्वारे (गुप्त बोली) पहिल्या दहा वर्षांसाठी या स्पर्धेचे टीव्ही प्रसारणासाठीचे हक्क सोनी या कंपनीने ८२०० कोटींना विकत घेतले होते. त्यानंतर २०१७ ला स्टार स्पोर्ट्सने १६,३४७ कोटींची बोली लावत टीव्ही आणि डिजिटलचे प्रसारण हक्क स्वत:च्या ताब्यात घेतले. क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वात मोठी बोली होती.

२००८ ते २०१७
सोनी इंडिया : ८२०० कोटी

२०१८ ते २०२२
स्टार स्पोर्ट्स  : १६,३४७ कोटी


या पॅकेजेसची एकूण बेस प्राईस किती आणि त्याचे प्राईस ब्रे-अप कसे होणार?
चारही पॅकेजेसची एकूण बेस प्राईस ही ३२,४४० कोटी इतकी असेल.
पॅकेज ए : १८,१३० कोटी 
(७४ सामने X ४९ कोटी X ५ सत्र)
पॅकेज बी : १२,२१० कोटी 
(७४ सामने X ३३ कोटी X ५ सत्र)
पॅकेज सी : ९९० कोटी 
(१८ सामने X ११ कोटी X ५ सत्र)
पॅकेज डी : १११० कोटी 
(७४ सामने X ३ कोटी X ५ सत्र)

एकच कंपनी सर्व पॅकेजसाठी एकच बोली लावू शकते?
नाही. प्रत्येक पॅकेजसाठी स्वतंत्र बोली लावावी लागेल.
एकच कंपनी सर्व पॅकेज विकत घेऊ शकते?
हो. आपल्या आवाक्यानुसार कंपन्या एक किंवा त्यापेक्षा जास्त पॅकेज विकत घेऊ शकतात.

क्लोजिंग बीड (गुप्त बोली) हा प्रकार काय?
आतापर्यंत या पद्धतीने आयपीएल प्रसारण हक्कांचा लिलाव पार पडत गेला आहे. या अंतर्गत एकाने लावलेली बोली ही दुसऱ्याला माहिती नसते. त्यामुळे दोन्ही बोलींमध्ये बरीच तफावतही पाहायला मिळते. उदाहरणार्थ, आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरसाठी जेव्हा ओप्पो आणि या व्हीवो या कंपन्यांमध्ये बोली लागली तेव्हा ओप्पोने १४०० कोंटीची बोली लावली तर व्हीवोने २२०० कोटींची. कारण हे गुप्त पद्धतीने झाले असल्याने प्रत्येकाने आपल्या आवाकानुसार बोली लावली. त्यामुळे थेट ८०० कोंटीचा फरक दिसला. पण बीसीसीआयची मात्र यामुळे चांगलीच भरभराट झाली. कारण हीच बोली जर खुल्या पद्धतीने झाली असती तर दोन्ही कंपन्यांच्या बोलीमध्ये इतका फरक आला नसता. यावेळी मात्र ही पद्धत बंद करून ई-लिलाव बीसीसीआय घेणार आहे.

ई-लिलाव म्हणजे काय?
या लिलावामध्ये बोली कोणत्या कंपनीने लावली हे दिसणार नाही. मात्र किती बोली लावली जात आहे, हे प्रतिस्पर्धी कंपनीला दिसत राहील. त्यामुळे काय तर दोन कंपन्यांच्या बोलीमध्ये आधीसारखा ८ हजार कोटींचा फरक येणार नाही. टप्प्याटप्याने ही बोली बाढत जाईल आणि अंतिमत: बोलीचा उच्चांक आवाक्याबाहेर गेल्याचे कळताच एक-एक कंपनी या लिलावातून माघार घेईल आणि सर्वोच्च बोली लावणाऱ्याला आयपीएलचे प्रसारण हक्क दिले जातील. ही लिलाव प्रक्रिया आज सकाळी ११ वाजता सुरू होईल. मात्र शर्यतीत असलेल्या मातब्बर कंपन्यांचा आवाका बघितला तर हा लिलाव २ ते ३ दिवसही चालू शकतो.

शर्यतीत कोण?
वायकोम18 जेव्ही (जॉईंट व्हेंचर), सध्याचे वॉल्ट डिझ्नी (स्टार), झी आणि सोनी. पहिल्या दोन पॅकेजेससाठी या बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. तर अन्य पॅकेजसाठी टाइम्स इंटरनेट, फनएशिया, ड्रीम११, फॅनकोड यांच्यात चुरस राहू शकते. याशिवाय भारतीय उपखंडाबाहेरील पॅकेजसाठी स्काय स्पोर्ट्स (ब्रिटन) आणि सुपरस्पोर्ट (दक्षिण आफ्रिका) यांच्यात चढाओढ राहील.

बोलीची रक्कम किती ?
५० लाखांच्या अंतराने बोलीची किंमत वाढत जाईल. म्हणजेच जर कोणी ३३ हजार कोंटींची बोली लावली तर दुसऱ्याला त्यापेक्षा जास्त बोली लावण्यासाठी ५० लाखांच्या अंतराने किंमत सांगावी लागेल.

बीसीसीआयला या लिलावातून किती रक्कम मिळू शकते?
मुळात बीसीसीआयने २०२३ ते २०२७ या पाच सत्रांसाठी ३२,४४० कोटी इतकी बेस प्राईस ठेवली आहे. तसेच लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांची क्रयशक्ती पाहता यात १२ ते १३ हजार कोटींची भर पडू शकते. म्हणजेच बीसीसीआय या लिलावातून जवळपास ४५ हजार कोटींची रक्कम प्राप्त करू शकते.

क्रीडा जगतातला प्रसारण हक्कांसाठीचा सर्वात मोठा लिलाव ठरेल का?
२०२० च्या आकडेवारीनुसार अमेरिकेतल्या नॅशनल फुटबॉल लीगमध्ये एका सामन्याचे हक्क हे १३१ कोटी इतके होते. तर इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये एक सामना ७२ कोटींचा होता. त्यामुळे सध्यातरी आयपीएलमधला हा लिलाव जगातला सर्वात महाग लिलाव ठरण्याची 
शक्यता कमी आहे.
 

Web Title: Thousands of crores on IPL Media Rights Auction today for 5 years broadcasting rights what exactly is the procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.