नवी दिल्ली : प्रत्येक सामन्यापूर्वी टॉस केला जातो. सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार एकत्र येतात आणि टॉस केला जातो. पण टॉसच्यावेळी तीन कर्णधार आलेले तुम्ही कधी पाहिलंय का? आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये मात्र असं कधीच घडलेलं नाही. पण ही गोष्ट मात्र आता घडलेली पाहायला मिळाली आहे. पण हे नेमकं कसं आणि का घडलं, हे जाणून घ्या...
एका सामन्याच्या टॉससाठी चक्क तीन कर्णधार मैदानात आल्याचे पाहत साऱ्यांनाच धक्का बसला. नेमके तीन कर्णधार खेळपट्टीवर जाऊन करणार काय किंवा टॉस उडवल्यावर नेमकं कोण कौल मागणार, हा प्रश्न साऱ्यांच्याच मनात आला.
ही गोष्ट घडली ती ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील महिलांच्या सामन्यात. या दोन्ही संघांमध्ये पहिला ट्वेन्टी-20 सामना होणार होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून दोन खेळाडू टॉस करण्यासाठी आले. यामध्ये कर्णधार मॅग लेनिंग आणि एलिसा हिली यांचा समावेश होता. दुसरीकडे श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू उपस्थित होती. जेव्हा लेनिंगला याबद्दल विचारणार करण्यात आली, तेव्हा तिने दिलेले उत्तर ऐकून तुम्हीही चक्रावून जाल.
याबाबत ऑस्ट्रेलियाची कर्णधार लेनिंग म्हणाली की, " मी टॉसच्या बाबतीत फारच अनलकी ठरले आहे. बरेच टॉस मला जिंकता आलेले नाहीत. त्यामुळे टॉससाठी कर्णधार म्हणून मी हिलीची निवड केली आहे."
हंगामी कर्णधारपद किंवा फक्त टॉससाठी हिलीला कर्णधारपद देण्यात आले आणि तिने टॉस जिंकल्याचेही पाहायला मिळाले. आता ही श्रद्धा की अंधश्रद्धा, आता तुम्हीच ठरवा.