इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठी मजबूत संघबांधणीसाठी सर्व आठ संघांनी कंबर कसली आहे. आयपीएलच्या लिलावापूर्वीच्या ट्रेडमध्ये 11 खेळाडूंची अदलाबदली झाली. त्यात अजिंक्य रहाणे, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट ही मोठी नावं आहेत. 19 डिसेंबरला कोलकाता येथे 2020साठीचा खेळाडूंचा लिलाव होणार आहे. एकीकडे आयपीएलचा चर्चा असताना बांगलादेश प्रीमिअर लीगचाही ड्राफ्ट जाहीर करण्यात येणार आहे. त्यात तीन भारतीय खेळाडूंचे नाव चर्चेत आहे. विशेष म्हणजे यात चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजाचाही समावेश आहे.
बांगलादेश प्रीमिअर लीगच्या 7व्या मोसमाला 11 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. 7 संघांचा समावेश असलेली ही लीग 16 जानेवारी 2020 पर्यंत खेळवण्यात येईल. या लीगसाठीचा ड्राफ्ट लवकरच जाहीर होणार आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी सांगितले की,''भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी करारबद्घ नसलेले भारतीय खेळाडू बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. या लीगमध्ये हे शक्य होईल की नाही, याबाबत मला खात्री नाही, परंतु भविष्यात भारतीय खेळाडू या लीगमध्ये नक्की दिसतील.''
भारतीय संघाचे माजी खेळाडू हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांची अनुक्रमे 100 आणि कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ड्राफ्टममध्ये निवड करण्यात आली होती. पण, या दोघांनी माघार घेतली. युवराज सिंग आणि मनप्रीत गोनी यांच्याबाबतीतही असेच झाले होते, परंतु या दोघांनीही निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळाले. बांगलादेश प्रीमिअर लीगसाठीच्या ड्राफ्टमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा माजी गोलंदाज मनप्रीत गोनी, मनवींदर बिस्ला आणि राजस्थान रॉयल्सचा कुमार बोरेसा यांच्यासह 439 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
मनप्रीत गोनीकडे चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील संघांचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव आहे. बिस्ला डेक्कन चार्जर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे. कुमार बोरेसानं क्रिकेट स्टार ऑफ राजस्थानचा पुरस्कार पटकावला आहे.
Web Title: Three Indian players to be a part of Bangladesh Premier League Draft
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.