सुरत, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, महिला क्रिकेट : मिगनन डू प्रीझ (59)च्या दमदार अर्धशतकानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला पहिल्या ट्वेंटी- 20 सामन्यात यजमान भारताविरुद्ध 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताने दिलेल्या 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 19.5 षटकांत 119 धावांत संपुष्टात आला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर सर्वाधिक 43 धावा केल्या. या सामन्यात भारताची फिरकीपटू दिप्ती शर्मानं कमालच केली. तिनं चार षटकांत 8 धावा देत 3 विकेट्स घेत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पण, पहिल्या तीन षटकांत तिनं एकही धाव न देता तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे पुरुषांच्या ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये असा विक्रम कोणी केलाय का, याची सोशल मीडियावर शोधाशोध सुरू झाली.
शाब्बास पोरी... विराट, धोनी यांना जे जमलं नाही ते स्मृती मानधनाने करून दाखवलं
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आफ्रिकेने यजमानांना 20 षटकांत 8 बाद 130 धावांत रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आफ्रिकेची 14व्या षटकात 7 बाद 73 अशी अवस्था केली. मात्र एका बाजूने टिकलेल्या प्रीझने 43 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 59 धावांची खेळी करत संघाच्या आशा कायम राखल्या. अखेरच्या षटकात आफ्रिकेला 18 धावांची गरज असताना राधा यादवच्या पहिल्याच चेंडूवर प्रीझने षटकार मारला. मात्र यानंतर दोन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर राधाने चौथ्या चेंडूवर प्रीझला व पाचव्या चेंडूवर एन. म्लाबाला बाद करुन भारताचा विजय साकारला. यासह भारताने सात सामन्यांची पराभवाची मालिका खंडित केली.दिप्तीनं पहिल्या तीन षटकांत एकही धाव दिली नाही आणि तिन विकेट्सही घेतल्या. त्यामुळे तिची गोलंदाजीचे स्टॅट्स हे 03-03-00-03 असे दिसत होते. यामुळे क्रिकेटप्रेमीही चक्रावले.