नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने खुलासा केला की, काही वर्षांपूर्वी वैयक्तिक अडचणींमुळे त्याच्या मनात तीनवेळा आत्महत्या करण्याचा विचार आला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना त्याच्यावर सातत्याने नजर ठेवावी लागली होती.गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेल्या शमीने आपला सहकारी व भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर वार्तालाप करताना आपल्या खासगी व व्यावसायिक जीवनाबाबत चर्चा केली.
शमी म्हणाला, ‘मला वाटते की त्यावेळी जर माझ्या कुटुंबीयांची मला साथ लाभली नसती तर मी माझे क्रिकेट गमावले असते. मी तणावात होतो आणि वैयक्तिक अडचणींसोबत संघर्ष करीत होतो. त्यावेळी मी तीनवेळा आत्महत्या करण्याचा विचार केला होता.’ शमी पुढे म्हणाला,‘माझे दोन-तीन मित्र नेहमी माझ्यासोबत असायचे. माझे आई-वडील ते सर्व विसर आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित कर, असे सांगायचे. कुठल्याही बाबीचा विचार करू नको, असेही ते सांगायचे. त्यानंतर मी सरावाला सुरुवात केली आणि डेहराडूनमध्ये एका अकादमीमध्ये बराच घाम गाळला.’ शमी रोहितला म्हणाला,‘त्या परिस्थितीतून सावरणे कठीण होते. कारण रोज तोच तो सराव करावा लागत होता. माझ्या कौटुंबिक समस्येला सुरुवात झाली होती आणि दरम्यान अपघातात दुखापतही झाली होती. ही घटना आयपीएलच्या १०-१२ दिवसांपूर्वी घडली होती. त्यावेळी मीडियामध्ये माझ्या खासगी जीवनावर अनेक बातम्या येत होत्या.’
शमी विश्वकप २०१५ नंतर दुखापतग्रस्त झाला होता. त्याला पुनरागमन करण्यासाठी १८ महिने लागले. तो म्हणाला,‘ज्यावेळी विश्वकप २०१५ मध्ये मी दुखापतग्रस्त झालो त्यावेळी पूर्ण फिटनेस मिळविण्यासाठी १८ महिने लागले. हा माझ्या जीवनातील सर्वांत खडतर कालावधी होता. त्यावेळी मी तणावात होतो.’ २४ व्या माळ्यावरून उडी मारण्याची भीतीशमीने सांगितले की, त्याच्या कुटुंबीयांना भीती होती की मी अपार्टमेंटच्या २४ व्या माळ्यावरून उडी मारू शकतो. शमी म्हणाला,‘मी त्यावेळी आपल्या क्रिकेटबाबत विचार करीत नव्हतो. माझ्या रुममध्ये माझे कुटुंबीय पहारा देत होते. मी केव्हा झोपणार व केव्हा उठणार, याची कल्पना नव्हती. आम्ही २४ व्या मजल्यावर राहात होतो. कुटुंबीयांना माझ्याबाबत २४ व्या माळ्यावरून उडी मारण्याची भीती वाटायची. माझ्या भावाने त्यावेळी माझी खूप मदत केली.’