जोहान्सबर्ग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द.आफ्रिकेत १८ जुलैपासून पुन्हा एकदा क्रिकेटची सुरुवात होणार आहे. आघाडीच्या २४ खेळाडूंची तीन संघात विभागणी करण्यात येऊन एका सामन्याचे आयोजन होणार आहे. हा सामना आधी २७ जून रोजी होणार होता. तथापि, आरोग्य दिशा-निर्देशांमुळे मंजुरी मिळू शकली नव्हती.
आता हा सामना दिवंगत राष्टÑपती नेल्सन मंडेला यांच्या जन्मदिनानिमित्त १८ जुलै रोजी खेळविण्यात येणार असल्याची घोषणा क्रिकेट द.आफ्रिकेने केली आहे. बोर्डाचे सीईओ जॅक फाऊल म्हणाले,‘या सामन्याच्या आयोजनासाठी मंडेला यांच्या जन्मदिनासारखा दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही. सामन्याचा हेतू कोरोनामुळे संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी निधी गोळा करणे हा आहे. कोरोनानंतर द.आफ्रिकेत थेट प्रसारित होणारा हा पहिलाच सामना असेल.
‘थ्रीटी क्रिकेट’अशी ओळख असलेल्या या सामन्याचे आयोजन सेंच्युरियन मैदानावर होईल. मात्र यावेळी प्रेक्षकांची उपस्थिती नसेल. आठ-आठ खेळाडूंचे तीन संघ असतील. एकाच सामन्यात प्रत्येक संघाला १२ षटके दिली जातील. दोन संघ सहा-सहा गोलंदाजी करतील. तिन्ही संघांचे नेतृत्व क्विंटोन डिकॉक, एबी डिव्हिलियर्स आणि कासिगो रबाडा हे करणार आहेत. खेळाडू तीन दिवस आधी सामन्यासाठी एकत्र येणार आहेत. सर्वांची कोरोना चाचणी सामन्याआधी आणि सामन्यानंतर केली जाईल.
खेळाडूंना पाच दिवसाआधी सरकारने गटागटात सराव करण्याची खेळाडूंना मुभा दिली आहे. या सामन्याद्वारे आघाडीच्या क्रिकेटपटूंना दीर्घकाळानंतर सामन्याचा सराव करण्याची संधी मिळणार असून, त्यातून आर्थिक मदतही उभारली जाणार आहे. स्थानिक सामने सरू करण्याआधी या सामन्याकडे चाचणी म्हणून पाहिले जात आहे.