ठळक मुद्देफलंदाजीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे आधारस्तंभ ठरतील. रोहितच्या जोडीला डावाची सुरुवात करण्यासाठी अनुभवी शिखर धवन किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला संधी मिळेल
अहमदाबाद : कसोटी मालिकेत जबरदस्त पुनरागमन करताना ३-१ असा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी होणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. मर्यादित षटकांमध्ये दोन्ही संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने प्रत्यक्ष मैदानावर चांगला खेळ करणारा संघच बाजी मारणार हे निश्चित. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून भारतीय संघ या मालिकेकडे पाहत आहे. यासाठीच संघाचा भक्कम ताळमेळ साधण्याचे लक्ष्य भारतीय संघ व्यवस्थापनेने बाळगले आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी एक मजबूत संघ तयार करण्यावर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्री यांचा भर आहे. त्यात, इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टी-२० क्रमवारीतील अव्वल संघाचे तगडे आव्हान असल्याने भारतीय खेळाडूंसाठी ही एक मोठी संधी आहे.
या संपूर्ण मालिकेसाठी फलंदाजीला पोषक असलेली खेळपट्टी तयार करण्यात येणार असल्याचे बोलले जात असल्याने भारतीय गोलंदाजांची मोठी कसोटी लागेल. आघाडीचा आणि प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि टी. नटराजन या मालिकेत खेळणार नसल्याने भारतीय गोलंदाजांची मुख्य धुरा भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांच्यावर असेल. त्याचप्रमाणे, वॉशिंग्टर सुंदर, अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजांसह शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि नवदीप सैनी यांच्यावरही भारताची मदार आहे.
फलंदाजीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे आधारस्तंभ ठरतील. रोहितच्या जोडीला डावाची सुरुवात करण्यासाठी अनुभवी शिखर धवन किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. गेल्या काही सामन्यांतील प्रभावी कामगिरी पाहता राहुलला पसंती मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र अनुभवाला प्राधान्य दिल्यास धवनचे पारडे जड आहे. धवनला रोहितसह सलामीला पाठवल्यास राहुल चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. मात्र असे झाल्यास श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला संघाबाहेर बसावे लागेल. दुसरीकडे, ॠषभ पंत व अष्टपैलू हार्दिक पांड्या यांची फटकेबाजी निर्णायक ठरू शकेल.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ॠषभ पंत, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टर सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवटिया आणि इशान किशन (पर्यायी यष्टिरक्षक).
इंग्लंड : इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रीस टॉपले, ख्रिस जॉर्डन, मार्क वूड, सॅम कुरेन, टॉम कुरेन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टॉ आणि जोफ्रा आर्चर.
इंग्लंडकडेही मजबूत फळी
मर्यादित षटकांमध्ये आणि विशेषकरून टी-२० क्रिकेटमध्ये गेल्या काही सामन्यांत इंग्लंडने दबदबा राखला आहे. त्यांच्याकडे अनेक खेळाडू मॅचविनर असून, भारताला छोटीशी चूकही महागात पडू शकते. कर्णधार इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, डेव्हिड मलान आणि जेसन रॉय यांच्याकडे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे स्टोक्ससह सॅम कुरेन आणि मोईन अली अशी तगडी अष्टपैलू खेळाडूंची फळीही इंग्लंडकडे आहे. गोलंदाजीत त्यांची मदार जोफ्रा आर्चर, मार्क वूड, ख्रिस जॉर्डन आणि आदिल रशिद यांच्यावर असेल.
Web Title: The thrill of T20 from today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.