नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार युनिस खान याने त्याला एकादा चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने माझ्या मानेवर चक्क चाकू लावला होता, असा सनसनाटी खुलासा माजी फलंदाजी कोच ग्रांट फ्लॉवर यांनी केला.
झिम्बाब्वेचे माजी खेळाडू असलेले फ्लॉवर यांना ‘तुमच्या कोचिंग कारकिर्दीत कुठल्या कठीण अडचणींचा सामना करावा लागला,’असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ४९ वर्षांच्या ग्रांट यांनी युनिस खानचा प्रताप कथन केला. फ्लॉवर हे २०१४ ते २०१९ या कालावधीत पाकिस्तानचे फलंदाजी कोच होते. सध्या ते श्रीलंका संघाचे फलंदाजी कोच आहेत.
भाऊ अॅण्डी फ्लॉवर आणि नील मँथोर्प यांच्यासोबत चर्चेत सहभागी झालेले ग्रांट म्हणाले, ‘२०१६ ला आॅस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेनमध्ये घडलेला तो प्रसंग आठवतो. कसोटी सामन्यादरम्यान सकाळी नाश्त्याच्या वेळी मी फलंदाजांना सल्ला देत होतो. युनिसला माझा सल्ला आवडला नाही, त्याने चाकू थेट माझ्या मानेवर लावला. मिकी आर्थर शेजारी बसले होते. त्यांनी हस्तक्षेप करीत प्रकरण हाताळले.’ युनिस त्यावेळी पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. दुसºया डावात त्याने ६५ धावा केल्या. तिसºया कसोटीत त्याने नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. पाकने तीन सामन्यांची मालिका ०-३ ने गमावली. युनिसला अलीकडे पाकिस्तानच्या इंग्लंड दौºयासाठी पाकचा फलंदाजी कोच नेमण्यात आले होते. त्याने पाककडून ११८ कसोटीत १०,०९९ धावा केल्या आहेत. ग्रांट पुढे म्हणाले, ‘तो किस्सा थरारक होता, मात्र कोचिंगचा एक भाग आहे. कोचिंगच्या प्रवासात कडू -गोड आठवणी येत असतात. बरेच काही शिकायचे आहे, मात्र आतापर्यंतचा प्रवास आनंददायी ठरला.’
फ्लॉवर यांनी पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज अहमद शहजाद हे विलक्षण व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. शहजाद कौशल्य असलेला फलंदाज आहे मात्र बंडखोर वृत्तीचा आहे. बंडखोर खेळाडू प्रत्येक संघात असतो. मात्र आपल्या खेळाच्या बळावर संघातील स्थान टिकवून ठेवतात, असे फ्लॉवर म्हणाले.