India Vs Pakistan, ICC Men’s T20 World Cup 2022 - ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक नुकतंच आयसीसीनं जाहीर केलं. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ७ शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना MCG वर खेळवण्यात येईल. २३ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत उतरणार आहे आणि २०२१मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा त्यांचा निर्धार असणार आहे. India vs Pakistan लढतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या ६ दिवसांत म्हणजेत १६ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत फर्स्ट राऊंडचे सामने होतील. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून सुपर १२ च्या सामन्यांना सुरुवात होईल. सुपर १२मधील पहिलाच सामना २०२१ स्पर्धेतील अंतिम दोन संघांमध्ये म्हणजेच यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड ( Australia vs New Zealand) असा होईल. सुपर १२मध्ये संघांची दोन गटांत विभागणी केली आहे. ग्रुप १ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचा, तर ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. भारताचे सामने मेलबर्न, सिडनी, पर्थ व एडिलेड या चार मैदानावर होतील.
भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक
- २३ ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न; दुपारी १.३० वाजल्यापासून
- २७ ऑक्टोबर - विरुद्ध ग्रुप ए चा उप विजेता, सिडनी; दुपारी १२.३० वाजल्यापासून
- ३० ऑक्टोबर - विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ; सायंकाळी ४.३० वाजल्यापासून
- २ नोव्हेंबर - विरुद्ध बांगलादेश, एडिलेड; दुपारी १.३० वाजल्यापासून
- ६ नोव्हेंबर - विरुद्ध ग्रुप बी चा विजेता, मेलबर्न; दुपारी १.३० वाजल्यापासून
भारत-पाकिस्तान सामन्याच्या सर्व तिकीटांची मिनिटांत विक्री...आयसीसीनं आजपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या ऑनलाईन तिकिटांच्या विक्रीस सुरुवात केली आणि अवघ्या काही मिनिटांतच भारत-पाकिस्तान सामन्यांची तिकीटं विकली गेली.