आशिया चषकात आज बांगलादेश आणि भारत यांच्यात सामना होत आहे. आजच्या सामन्यातून मुंबई इंडियन्सचा शिलेदार तिलक वर्मा वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. कर्णधार रोहित शर्माने युवा खेळाडूला कॅप सोपवली. खरं तर आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला तेव्हा तिलकची सरप्राईज एन्ट्री पाहायला मिळाली होती. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताला आपली छाप सोडणाऱ्या या युवा खेळाडूने वेस्ट इंडिजविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत अप्रतिम खेळी केली होती.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. रोहितने यावेळी सांगितले की, होय, हा नक्कीच धाडसी निर्णय आहे. पण या स्पर्धेत आम्हाला कमीवेळा आव्हानाचा पाठलाग करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आमच्यासाठी ही एक संधी असेल. आव्हानात्मक असेल पण संघाला मजबूत करण्यासाठी हे आव्हान स्वीकारले आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, लोकेश राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
दरम्यान, आजचा सामना आशिया चषकाच्या गुणतालिकेवर प्रभाव टाकणारा नसला तरी वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा सामना महत्त्वाचा आहे. कारण बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे, तर भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना खेळवला जाईल.
Web Title: Tilak Varma as he receives his Team India ODI cap from captain Rohit Sharma for his ODI debut, know here
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.