मुंबई : युवा फलंदाज तिलक वर्मा देशासाठी तिन्ही प्रकारात खेळू शकणारा फलंदाज बनू शकतो, असे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. यंदा आयपीएलमध्ये जे युवा खेळाडू प्रभावी ठरले, त्यात तिलकचा समावेश आहे. त्याने मुंबईकडून १२ सामन्यांत ३६८ धावा करीत लक्ष वेधले. कर्णधार रोहित शर्मा याने तिलकबाबत असेच वक्तव्य केले होते.
गावसकर म्हणाले, ‘तिलक वर्मामध्ये कमालीची मानसिकता आहे. सीएसकेविरुद्ध संघ दडपणाखाली असताना त्याने मैदानात पाय ठेवला. एक - दोन धावा घेत प्रभावीपणे खेळ पुढे नेला. त्याच्याकडे अनेक प्रकारचे फटके मारण्याची क्षमता असून स्ट्राईक रोटेट करतो. क्रिकेटचे चांगले ज्ञान असणारा हा खेळाडू मोठी मजल गाठू शकेल.’
तुमच्याकडे क्रिकेटचे कौशल्य असेल, तर तुम्ही संकटातून संघाला बाहेर काढू शकता. खेळाचे विश्लेषण करून धावा काढू शकता. बेसिक्सवर लक्ष केंद्रित करणारा हैदराबादचा हा युवा खेळाडू भविष्यात भारतीय संघाकडून तिन्ही प्रकारात फलंदाजी करू शकेल. त्याने फलंदाजीत आणखी थोडी मेहनत घ्यावी. फिटनेस आणि तंत्र सुधारावे. रोहितचे त्याच्याबद्दलचे मत लवकरच खरे होताना आपण पाहू शकतो. योग्य तंत्रानुसार तिलक मागे येत चेंडू खेळू शकतो. सरळ बॅटने फ्रंटफूटवर बचावात्मक फटके मारताना त्याची बॅट पॅडच्या अगदी जवळच असते. हे बेसिक्स तुम्हाला योग्य मानसिकता राखून खेळण्याची ताकद प्रदान करतात. या दोन्ही गोष्टी तिलकला भारतीय संघातील नियमित फलंदाज म्हणून स्थान मिळवून देतील, यात शंका नसल्याचे मत गावसकर यांनी व्यक्त केले.