'तू लवकरच भारतीय संघाकडून खेळशील.' टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आयपीएल २०२३ मध्ये RCBची धुलाई करणाऱ्या तिलक वर्माकडे बोलून दाखवले होते. ऑगस्ट २०२३ मध्ये तिलकने वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले अन् आशिया चषक २०२३च्या वन डे संघात त्याची आता निवड झाली आहे. २० वर्षीय तिलक वर्मा सध्या आयर्लंड दौऱ्यावर ट्वेंटी-२० मालिका खेळतोय आणि आशिया चषक स्पर्धेत निवड झाल्याचे समजताच तो भावनिक झाला.
BCCI ने तिलकचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. वर्मा म्हणाला,''आशिया चषक स्पर्धेतून थेट वन डे संघातून पदार्पणाची संधी मिळेल, याचा मी विचारही केला नव्हता. वन डे संघात लवकरच पदार्पण करेन असा विश्वास होता मला, पण ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. भारताच्या वन डे संघातून खेळण्याचे मी स्वप्न नेहमीच पाहिले होते. एकाच वर्षात मी ट्वेंटी-२०त पदार्पण केले आणि आता पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत खेळण्याची मला संधी मिळतेय. मी त्यासाठी तयार आहे.''
इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये तिलक मुंबई इंडियन्सकडून खेळला अन् त्याने खोऱ्याने धावा केल्या. वेस्ट इंडिज दौऱ्यावर ट्वेंटी-२०त पदार्पणाची संधी मिळताच त्याने ३ सामन्यांत ५७च्या सरासरीने १७२ धावा केल्या. आयपीएलमध्ये रोहितने तिलकला त्याच्या शैलीत खेळण्याचे स्वातंत्र्य दिले. ''रोहित भाईने मला नेहमी सपोर्ट केला. आयपीएलमध्ये मी सुरुवातीला नर्व्हस होतो, परंतु रोहित मला नेहमी सांगायचा.. जा आणि तू जसा खेळतोस तसाच खेळ कर, प्रश्न विचारायला घाबरू नकोस. तुझ्या खेळाचा आनंद लुट, हे तो मला सांगायचा. आशिया चषक संघात निवड झाल्याने मी आनंदी आहे,''असे तिलक म्हणाला.
आयपीएल २०२३ तिलकने मुंबई इंडियन्सकडून १४ सामन्यांत ३९७ धावा चोपल्या. ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिलकने ३७.३५ च्या सरासरीने ५२३ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत ५६.१८च्या सरासरीने १२३६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ५ अर्धशतकं आहेत.