Join us  

तिलक वर्मा म्हणजे दुसरा रोहित शर्मा असून वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी द्यायला हवी - अश्विन

World Cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. 

By ओमकार संकपाळ | Published: August 08, 2023 3:05 PM

Open in App

 Ravichandran Ashwin On Tilak Verma : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकात टीम इंडियाची अग्निपरीक्षा असणार आहे. कारण यजमान भारतीय संघाला स्पर्धेचा प्रमुख दावेदार मानले जात आहे. अशातच आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवून तमाम भारतीयांची दिवाळी गोड करण्याचे आव्हान रोहितसेनेसमोर आहे. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच भारतीय संघातील खेळाडूंची चाचपणी केली जात आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकासाठी १८ सदस्यीय संभाव्य संघ जाहीर केला आहे. अन्य संघ देखील पुढील काही दिवसांत आपापल्या संघाची घोषणा करतील. अशातच भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने एक अजब विधान केले आहे. अश्विनने तिलक वर्माला संघात स्थान मिळायला हवे असे म्हटले आहे. 

तिलक वर्माने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने (३९) तर दुसऱ्या सामन्यात (५१) धावा केल्या. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना भारताच्या युवा शिलेदाराचे तोंडभरून कौतुक केले. तसेच तिलक वर्माला भारतीय संघात संधी दिल्यास संघाच्या मधल्या फळीची समस्या दूर होऊ शकते, असा दावा अश्विनने केला आहे.  दरम्यान, तिलकने आपल्या अप्रतिम खेळीने सर्वांना प्रभावित केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची त्याची शैली इतर खेळाडूंपेक्षा वेगळी आहे. तो भारतीय कर्णधार रोहित शर्मासारखा खेळतो. सहजरित्या पुल शॉट खेळण्याची क्षमता त्याच्यात आहे, असे खेळताना भारतीय खेळाडू फारसे दिसत नाहीत, असेही अश्विनने सांगतिले. 

तिलक वर्माला विश्वचषकात संधी मिळायला हवी - अश्विन भारतीय संघात डाव्या हाताच्या फलंदाजाची कमी आहे, म्हणूनच तिलक वर्माला विश्वचषकात संधी मिळायला हवी, असे अश्विनने म्हटले. संघातील टॉप-७ मध्ये रवींद्र जडेजा हा एकमेव डावखुरा फलंदाज आहे. विश्वचषक खेळणाऱ्या बहुतांश संघांकडे डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध चांगले फिरकीपटू नाहीत. अशा परिस्थितीत तिलक भारतीय संघासाठी अधिक प्रभावी ठरू शकतो. त्याने आपल्या खेळीने नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, असेही अश्विनने नमूद केले. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआर अश्विनरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App