ओमकार संकपाळ
मुंबई : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सची या हंगामातील वाटचाल चढ-उताराची राहिली आहे. मुंबईने मागील सामन्यात पंजाबला पराभूत करून सलग दुसरा विजय नोंदवला. अशातच मुंबईच्या संघात आगामी सामन्यांमध्ये काय बदल होणार, अर्जुन तेंडुलकरला पुन्हा संधी मिळणार का? याबाबत संघाचा माजी खेळाडू आदित्य तरेने 'लोकमत'शी साधलेल्या खास संवादात भाष्य केले आहे. तसेच रोहित शर्मानंतर तिलक वर्मावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाईल, असे आदित्यने म्हटले आहे.
"मुंबई इंडियन्सने या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी आगामी सामना जिंकला तर कदाचित टॉप-४ मध्ये देखील प्रवेश मिळू शकतो. सुरूवातीला मुंबईच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नव्हती. सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि टीम डेव्हिड यांनी मागील सामन्यांमध्ये शानदार खेळी केली. मात्र, संघाच्या गोलंदाजीत अनुभवाची कमी दिसून येत आहे. अर्शद खान, आकाश माधवन हे युवा गोलंदाज आहेत", अशा शब्दांत आदित्यने मुंबईच्या गोलंदाजांची पाठराखण केली.
गोलंदाजीत अनुभवाची कमी - तरे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांकडे अनुभवाची कमी आहे. मागील काही हंगामातील समीकरण वेगळे होते. जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्या या अनुभवी गोलंदाजांचा साठा होता. त्यामुळे मुंबईने अनेकदा गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकले आहेत. पण यंदा अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर खेळत आहे, तो एक जागतिक पातळीवरील गोलंदाज आहे पण सध्या त्याचा खराब फॉर्म आहे, असे आदित्यने सांगितले. याशिवाय वानखेडेवर झालेल्या पंजाबविरूद्धच्या सामन्याबद्दल त्याने म्हटले, "गोलंदाजी कशीही असली तरी वानखेडेवर मोठी धावसंख्या होत असते. पण फलंदाजी देखील चांगली असणे महत्त्वाचे आहे." रोहितच्या फॉर्मबद्दल म्हटले...मुंबई इंडियन्सला सामने जिंकायची सवय आहे. मुंबईने एक-दोन सामने जिंकले तरी संघ वेगळा दिसतो. रोहित स्फोटक खेळी करण्याच्या प्रयत्नात असतो... त्यामुळे तो मोठे फटकार खेळण्याच्या नादात बाद देखील होतो. पण त्याचा मानस असतो की, संघाला दबावातून बाहेर काढावे. त्याने दिल्लीत खराब खेळपट्टीवर ६५ धावा करून संघाला विजय मिळवून दिला होता. मुंबईचा पुढचा कर्णधार कोण?कर्णधार हा मोठ्या कालावधीपर्यंत संघाला साथ देईल असा असावा म्हणून तिलक वर्माकडे ही जबाबदारी सोपवली जाईल, असे आदित्यने म्हटले. तिलक युवा असून संघाला मोठ्या कालावाधीपर्यंत साथ देईल असे त्याने म्हटले. रोहितने वयाच्या २५व्या वर्षापासून कर्णधारपद सांभाळले आणि पाचवेळा मुंबईला विजयी केले. जवळपास १२ वर्षे त्याने ही जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे मला वाटते की तिलक वर्मामध्ये कर्णधार होण्याची क्षमता आहे. लक्षणीय बाब म्हणजे सूर्यकुमार यादवचे वय आता ३२ वर्षे आहे, तो यासाठी पात्र देखील आहे. पण लॉंग टर्मचा विचार केला तर तो कर्णधारपदासाठी पर्याय नसावा असे आदित्यने अधिक सांगितले.
अर्जुनची केली पाठराखणमुंबई इंडियन्सचा युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने यंदाच्या हंगामातून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. "अर्जुनची डेथ बॉलिंग चांगली असून तो यॉर्कर टाकण्यात माहिर आहे. सॅम करनसमोर गोलंदाजी करणे साहजिकच कठीण आहे. कारण तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू आहे. अर्जुनने अखेरच्या षटकांमध्ये मार खाल्ला पण तो त्यातूनच शिकेल. आगामी सामन्यांमध्ये देखील त्याला संधी मिळू शकते. त्याने नवीन चेंडूने चांगली सुरूवात केली आहे. तसेच मुंबई इंडियन्स आगामी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करून पराभवाचा वचपा काढेल", असे आदित्य तरेने स्पष्ट केले.
आदित्य तरे, IPL 2023 चे अधिकृत टीव्ही प्रसारक, स्टार स्पोर्ट्सवरील समालोचक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"