Join us  

IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansने तब्बल ८.२५ कोटी मोजून विकत घेतलेला Tim David कोण आहे? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

गेल्या वर्षी विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेला टीम आता रोहितच्या संघातून खेळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 12:03 PM

Open in App

Tim David, IPL 2022 Mega Auction मध्ये Mumbai Indiansने उत्तम संघबांधणी केली. त्यांनी फार खेळाडूंवर मोठी बोली लावली. इशान किशन हा हंगामातील सर्वात महागडा खेळाडू १५ कोटी २५ लाखांत मुंबईच्या संघात आला. त्या खालोखाल मुंबईच्या संघाने एका नव्या चेहऱ्यासाठी तब्बल ८ कोटी २५ लाख रूपये मोजले. मुंबईने टीम डेव्हिडवर जोरदार बोली लावली. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात त्याचं नाव घेतल्यानंतर मुंबईने त्याला आपली पसंती दर्शवली. इतरही काही संघांनी त्याच्यावर बोली लावली पण अखेर मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिडला आपल्या संघात विकत घेतलं.

टीम डेव्हिड कोण आहे?

भारताचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्या याला मेगा लिलावाआधी मुंबई इंडियन्स संघाने करारमु्क्त केलं. त्यामुळे मुंबईकडे हार्दिकच्या जागी तडाखेबाज फिनिशर कोण, असा सवाल होता. त्यात मुंबईने दुसऱ्या दिवशीच्या लिलावात मोठा डाव खेळत टीम डेव्हिड या ६ फूट ५ इंच धिप्पाड खेळाडूला संघात स्थान दिलं. टीम डेव्हिड हा मूळचा सिंगापूरचा क्रिकेटपटू आहे. २५ वर्षांच्या डेव्हिडचे वडील रॉड हेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्यांनी १९९७च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. डेव्हिड सिंगापूरचा नागरिक आहे, परंतु त्याचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असून डेव्हिड तिथेच लहानाचा मोठा झाला.

याआधी विराटच्या RCBचं केलंय प्रतिनिधित्व

सिंगापूरचा टीम डेव्हिड IPL 2021मध्ये RCB च्या संघाकडून खेळला आणि आयपीएल खेळणारा तो सिंगापूरचा पहिलाच खेळाडू ठरला. डेव्हिडला IPL मध्ये केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली. पण त्याने नुकत्याच झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने तुफान फटकेबाजी केली. त्याने PSL मध्ये २९ चेंडूत ७१ आणि १९ चेंडूत नाबाद ५१ धावांची केलेली खेळी विशेष भाव खाऊन केली. बिग बॅश लीगमध्येही होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स संघाचे त्यानं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच रॉयल लंडन कप स्पर्धेतही त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ७० चेंडूत नाबाद १४० आणि ७३ चेंडूत १०२ धावा अशी दोन शतकं झळकावली आहेत.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी

टीम डेव्हिड सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५८पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं १४ सामने खेळला असून त्यात त्याने ५५८ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटसह बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग अशा एकूण ४९ टी२० सामन्यांचा त्याला अनुभव आहे. त्यात एकत्रित मिळून टीम डेव्हिडने १ हजार १७१ धावा केल्या आहेत.

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्या
Open in App