न्यूझीलंडचे खेळाडू हे खरे जंटलमन आहेत, हे त्यांनी त्यांच्या मैदानावरील कृतीनं दाखवून दिले आहे. मैदानाबाहेरही त्यांचा हा साधेपणा अनेकदा जाणवला आहे. न्यूझीलंड संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ८ विकेट्स राखून पराभूत केले. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले, परंतु या जग्गजेतेपदानंतर त्यांच्या वागण्यात कोणताच माज दिसला नाही. रॉस टेलरनं विजयी चौकार खेचल्यानंतर ना उडी मारली ना प्रतिस्पर्धी डिवचणारे कृत्य केले. तो नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या केनकडे गेला अन् त्याला मिठी मारली. त्याच्या या कृतीनं सर्वांची मनं जिंकली. आता किवी खेळाडूचा मनाचा मोठेपणा दाखवणारे आणखी एक कृती समोर आली आहे.
Euro 2020 : पेनल्टी शूटआऊटचा थरार, स्वित्झर्लंडकडून विश्वविजेत्या फ्रान्सची शिकार, Video
न्यूझीलंड संघाचा प्रमुख गोलंदाज टीम साऊदी यानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील एक जर्सीचे लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ८ वर्षांची हॉली बीथी या मुलीचा कॅन्सरशी संघर्ष सुरू आहे आणि तिच्या उपचारासाठी निधी गोळा करण्यासाठी साऊदीनं हा पुढाकार घेतला आहे. हॉली पाच वर्षांची असताना तिला न्यूरोब्लास्टोमा कॅन्सर झाल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्यावर उपचारासाठी कुटुंबीय निधी गोळा करत आहेत. साऊदीनं किवी खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी लिलावात ठेवली आहे. आतापर्यंत या जर्सीसाठी 2,59,831 हून अधिक किंमतीची बोली लागली आहे.
''काही वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबीयांना हॉलीबाबत समजले. हॉलीच्या कुटुंबीयांची इच्छाशक्ती, ताकद आणि सकारात्मक विचार पाहून मी थक्क झालो. हॉलीला उपचारासाठी आणखी निधीची गरज आहे, हे समजताच माझ्या परीनं मी छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे,''असे साऊदीनं लिहिले.