सिडनी : सिडनी क्रिकेट मैदानावर प्रेक्षकांद्वारे वर्णद्वेषी शेरेबाजी होणे काही नवे नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी कडक पाऊल उचलण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली.
येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी करणाऱ्या काही प्रेक्षकांना मैदानातून बाहेर काढण्यात आले.
चौथ्या दिवसाच्या खेळानंतर बोलताना अश्विन म्हणाला, भारतीय खेळाडूंना यापूर्वीही सिडनीमध्ये वर्णद्वेषाला सामोरे जावे लागले आहे. युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला सलग दोन दिवस ज्या प्रकारे वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले त्यासाठी ‘निराशा’ हा शब्द अपुरा पडेल. ऑस्ट्रेलियाचा हा माझा चौथा दौरा आहे. विशेषता सिडनीमध्ये यापूर्वीही आम्हाला अशा बाबींना सामोरे जावे लागले आहे. ते गैरवर्तन करीत होते आणि शिवीगाळ करीत होते, पण यावेळी त्यांनी ती मर्यादाही ओलांडली असून वर्णद्वेषी शेरेबाजी केली. विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख न करता त्याने २०११ च्या घटनेचा उल्लेख केला. त्यावेळी प्रेक्षकांच्या गैरवर्तनानंतर भारतीय खेळाडू मधले बोट दाखवित असल्याचे छायचित्र चर्चेत होते.’
अश्विन पुढे म्हणाला,‘एक-दोन वेळा खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिली आणि अडचणीत सापडले. कारण ते खेळाडू होते. प्रेक्षक ज्या प्रकारे टिपणी करीत होते ते योग्य नव्हते.’ रविवारी चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रादरम्यान या प्रकरणामुळे दहा मिनिट खेळ थांबलेला होता.
Web Title: This time he crossed the line - Ravichandran Ashwin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.