जम्मू काश्मीर - भारताचा माजी कर्णधार एम.एस धोनीनं पाकिस्तानबरोबरच्या मालिकेबाबत महत्वपुर्ण वक्तव्य केलं आहे. धोनीच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेबाबत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. धोनी सध्या जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर आहे.
याआधी पाकिस्ताननं 2012-13 मध्ये भारताचा दौरा केला होता. दोन टी-20 आणि तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये पाकिस्ताननं वनडे सीरिज जिंकली तर टी-20 सीरिज बरोबरीत सुटली. त्यानंतर अजूनही भारत-पाकिस्तानमध्ये सीरिज झालेली नाही. 2014 मध्ये बीसीसीआयनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत करार केला होता. 2015 ते 2023 पर्यंत भारत पाकिस्तान सहा सीरिज खेळेल, असं या करारात नमुद करण्यात आलं होतं. पण भारत-पाकिस्तानमधल्या संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये अजून एकही सीरिज होऊ शकली नाही.
श्रीनगरहून 35 कि.मी. अंतरावर उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात, कुझनेर क्रिकेट मैदानावर चिनार क्रिकेट प्रिमियर लीग सुरू आहे. तेथे धोनी प्रमुख पाहुणा म्हणून गेला होता. त्यावेळी तो पत्रकारांशी बोलत होता. यावेळी बोलताना धोनी म्हणाला की, भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिकेचं आयोजन व्हावं की नाही, याबाबतचा निर्णय सरकार चांगल्या प्रकारे करु शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या क्रिकेट मालिका हा फक्त खेळ नसून आणखी खूप काही आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हातात आहे. दहशतवाद आणि क्रिकेट एकाच वेळी होऊ शकत नाही, बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कुठलाही प्रस्ताव देण्याआधी केंद्र सरकारशी चर्चा करावी, अशी ठाम भूमिका भारतीय सरकारनं गेल्या काही वर्षापासून घेतलेली आहे. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धेव्यतिरिक्त भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये कोणताही सामना होत नाही.
गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. नियंत्रण रेषेवर पाककडून होत असलेल्या कुरापती आणि दहशतवाद्यांना आश्रय देऊन भारताला त्रास देण्याची त्यांची वृत्ती संतापजनक आहे. याच कारणांवरून भारत-पाकमधील क्रिकेट मालिका बंद करण्यात आल्यात. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी, हे क्रिकेटबंध पुन्हा जुळावेत असं पीसीबीला वाटतंय. तशा पुड्याही ते सतत सोडत असतात. परंतु, दहशतवाद थांबवल्याशिवाय क्रिकेट खेळणार नाही, या आपल्या भूमिकेवर भारत ठाम आहे.
आणखी पाहा- काश्मीरमध्ये महेंद्रसिंग धोनीसमोर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानविरुद्ध बीसीसीआयची व्यूहरचना - आगामी काळातील दौऱ्यांच्या नियोजन बैठकीत बीसीसीआय, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एकट पाडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी वर्षांमधल्या दौऱ्यांचं नियोजन करण्यासाठी आयसीसीची 7 आणि 8 डिसेंबरला सिंगापूरमध्ये एक बैठक होणार आहे. या बैठकीत बीसीसीआय भारतीय संघ; ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश या सहा संघांविरुद्ध मालिका खेळण्यासाठी तयार असल्याचं सांगणार असल्याचं कळतंय. याचसोबत बीसीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या करारानूसार दोन देशांमधले सामने रद्द करुन घेण्याकडेही बीसीसीआयचा कल असण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि सचिव अमिताभ चौधरी आयसीसीच्या या बैठकीला हजेरी लावणार असल्याचं समजतंय.