मेलबर्न : ‘आता वेळ आली आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या खांद्यावर ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्त्व सोपविण्याची हीच योग्य वेळ आहे,’ असे सांगत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) याने कर्णधारपदासाठी कमिन्सचे समर्थन केले. एका महिला सहकाऱ्याला २०१७ मध्ये पाठविलेल्या अश्लील मेसेजप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान टिम पेनने ऑस्ट्रेलियाचे कसोटी कर्णधारपद सोडले.वॉर्नच्या मते विद्यमान उपकर्णधार पॅट कमिन्सला ॲशेस मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून निवडले गेले पाहिजे. वॉर्नने सांगितले की, ‘माझ्या मते पॅट कमिन्सला कर्णधार बनविण्याची हीच योग्य वेळ आहे. पेनच्या राजीनाम्याआधीच मी हा विचार केला होता. कमिन्सचे चाहते जगभरात असून त्याच्यावर चाहते प्रेम करतात आणि त्याचा सन्मान करतात. मॅथ्यू वेड, जोश इंगलिस किंवा ॲलेक्स कॅरी यांच्यापैकी एकाला पेनच्या जागी स्थान मिळायला पाहिजे. इंगलिसला यष्टिरक्षक म्हणून माझी पहिली पसंती असेल. तो ३६० डिग्री खेळाडू आहे.
माणसाकडून चूक होते!शेन वॉर्नने टिम पेनप्रति सहानुभूती व्यक्त करताना म्हटले की, ‘जे काही झाले, त्याचे मला दु:ख आहे. त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांप्रती मला वाईट वाटते. या घटनेच्या आधारे मी त्याच्या कामगिरीचे विश्लेषण करणार नाही. सार्वजनिक आयुष्य जगत असताना चुका होणार नाही, असे नसते. खेळाडूही मनुष्य असतो आणि त्यांच्याही भावना असतात. टीका करणे बंद करावे, हे आपले काम नाही.’