हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजांची फळी कशी ढेपाळते याची प्रचिती गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात आली. भारताचा संपूर्ण संघ 92 धावांवर तंबूत परतला आणि किवींनी 8 विकेट व 212 चेंडू राखून विजय मिळवला. या पराभवानंतर धोनी संघासाठी कसा कामाला येतो, याची प्रचिती आल्याचे भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे.
धोनीची महती सांगताना गावस्कर म्हणाले की, " धोनी हा एक अनुभवी खेळाडू आहे. त्याचा अनुभवाचा आतापर्यंत संघाला चांगलाच फायदा झाला आहे. धोनी जर आजच्या सामन्यात असला असता तर कदाचित हे चित्र वेगळे असले असते."
गावस्कर पुढे म्हणाले की, " जेव्हा झटपट विकेट्स पडतात तेव्हा धोनी खेळपट्टीवर उभा राहतो. समोरचा खेळाडू खेळपट्टीवर उभा राहिल्याचे पाहून दुसऱ्या फलंदाजालाही धीर येतो. त्यामुळे पडझड थांबते आणि संघाचा डाव सुस्थितीत जाण्यास मदत होते. धोनी सुरुवातीला सावधपणे खेळपट्टीवर ठाण मांडत असला तरी त्यानंतर तो जलदगतीने धावा करू शकतो. त्यामुळे भारतीय संघात धोनीला अनन्य साधारण महत्व आहे."
रोहितनेही फोडले फलंदाजांवर पराभवाचे खापर
पराभवाचे कारण सांगताना रोहित म्हणला की, " ही खेळपट्टी संथ होती, त्याचबरोबर चेंडू चांगले स्विंगही होत होते. त्यामुळे या खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहणे गरजेचे होते. पण आम्ही या गोष्टीमध्ये सपशेल अपयशी ठरलो. आमचा एकही फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही. आम्हाला चांगल्या भागीदाऱ्या रचता आल्या नाहीत. त्यामुळेच आमचा पराभव झाला."
भारत क्लीन 'बोल्ट'हॅमिल्टनवर झालेल्या चौथ्या वन डे सामन्यात बोल्टने भारताच्या रोहित शर्मा, शिखर धवन, शुबमन गिल, केदार जाधव व हार्दिक पांड्या यांना बाद केले. भारताविरुद्ध एकाच सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो न्यूझीलंडचा सातवा गोलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध न्यूझीलंड गोलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. या विक्रमात शेन बाँड ( 6/23) आघाडीवर आहे.
रोहित द्विशतकी सामन्यात अपयशीरोहित शर्माचा हा 200 वा वन डे आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती, परंतु तो अपयशी ठरला. केवळ तोच नव्हे तर संपूर्ण संघ आज अपयशी ठरला. भारताच्या तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला आणि त्यात युजवेंद्र चहलच्या 18 धावा या सर्वोत्तम ठरल्या. रोहितला 150व्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता आणि योगायोग म्हणजे की तो सामना न्यूझीलंडविरुद्धच होता व त्यात ट्रेंट बोल्टनेच रोहितला बाद केले होते. कर्णधार म्हणून रोहितचा हा दुसरा पराभव ठरला. यातही योगायोग असा की दोन्ही पराभवात भारताचे सहा फलंदाज अवघ्या 35 धावांवर माघारी परतले होते.