अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार
पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर दुसरा कसोटी सामना जिंकण्याची संधी भारतीयांनी जवळपास घालवली आहे. भारताचे पाच फलंदाज उरले असून यामध्ये सर्वाधिक तळातील आहेत. तळातील फलंदाज आतापर्यंत काही विशेष करू शकलेले नाहीत. त्यामुळे केवळ चमत्कारच भारतीय संघाला वाचवेल.
मुरली विजय व लोकेश राहुल ही सलामी जोडी सलग अपयशी ठरत आहेत. मालिकेत आतापर्यंत चांगली सुरुवात मिळालेली नाही त्यामुळे इतर फलंदाजांवरही दबाव वाढला आहे. गोलंदाजीत हनुमा विहारीने रोहित शमाचे स्थान घेतले. अष्टपैलू म्हणून तो योगदान देत आहे. कोहलीनंतर कुणी स्थिती सांभाळत असेल तर तो विहारी आहे. चार जलद गोलंदाजांसह भारत मैदानात उतरला. या खेळपट्टीवर चारही गोलंदाज काहीसे यशस्वी झाले. आॅस्ट्रेलियाची धावसंख्या फार मोठी नाही. पहिल्या डावात त्यांनी ३२६ व दुसऱ्या डावात २४३ धावा केल्या. ही धावसंख्या मोठी वाटण्याचे कारण भारतीय फलंदाजी आहे. त्यामुळे मी त्यांनाच दोष देईन.
आज क्रिकेटमध्ये खूप तंत्रज्ञान वाढले आहे. यापूर्वी, पंचांनी बाद दिल्यानंतर फलंदाजांना मैदान सोडावे लागायचे. आता मात्र तसे होत नाही. आता ‘रिप्ले’ चेक केला जातो. त्यावर वाद रंगतात. काही अँगलवरून विराटचा झेल पकडल्याचे दिसत होते तर काही अँगलने ते स्पष्ट होत नव्हते.