Join us  

अभ्यासाबरोबर खेळातही अथक मेहनतीला पर्याय नाही - दिलीप वेंगसरकर

टोटल कप (१३ वर्षाखालील) क्रिकेट स्पर्धा : संजीवनी क्रिकेट अकादमीला विजेतेपद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 6:47 PM

Open in App

मुंबई: संजीवनी क्रिकेट अकादमी संघाने आय.डी.बी.आय.फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर  अकादमीला २३ धावांनी हरवून टोटल कप या १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान पटकावला. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सिनियर कौन्सिल राजू पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी बोलताना वेंगसरकर यांनी छोट्या खेळाडूना खेळाबरोबरच अभ्यासावरही विशेष लक्ष देण्यास सांगितले आणि यापुढे अकादमीत प्रवेश देताना शाळेचे प्रगती पुस्तकही पहिले जाईल असा प्रेमाने दम दिला. अभ्यासात तसेच खेळातही अथक मेहनतीला पर्याय नाही तसेच कुठलाही ‘शॉर्ट कट’ येथे उपयोगी पडणार नाही असाही सल्ला त्यांनी दिला. 

आय.डी.बी.आय. अकादमीने नाणेफेक जिंकून संजीवनीला प्रथम फलंदाजी दिली. मात्र या संधीचा लाभ उठविताना यष्टीरक्षक फलंदाज ओमकार पाटणकर (५९) आणि कर्णधार आदित्य बालीवडा (५५) यांनी १४.४ षटकात १०५ धावांची सलामी दिली. बालीवडा याने ४८ चेंडूत ५५ धावा करताना सात चौकार आणि एक षटकार ठोकला तर पाटणकर याने ५४ चेंडूत ५९ धावा करताना पांच वेळा चेंडू सीमापार केला. बालीवडा बाद झाल्यानंतर पाटणकरने निहार मगरेसह (१८) आणखी ३६ धावांची भर टाकून संघाला निर्धारित २० षटकात ३ बाद १५३ धावांचे लक्ष्य उभारून दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना आय.डी.बी.आय.फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर  अकादमीच्या  तुषार सिंघ (१८) आणि असिफ खान (२२) यांनी २८ धावांची सलामी दिली मात्र ऑफ स्पिनर अरिंजय लोखंडे याने तुषार सिंघचा त्रिफळा उडवत संजीवनीला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार यासीन सौदागर (४३) आणि आसिफ खान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भर टाकली पण डावखुरा फिरकी गोलंदाज सौरीश देशपांडेने असिफ खानला त्रिफळाचीत करीत त्यांना आणखी एक धक्का दिला. या धक्क्यातून आय.डी.बी.आय.फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर  अकादमी संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. यासीन सौदागर एका बाजूने संघासाठी खिंड लढवीत असताना दुसऱ्या टोकाकडून त्याला योग्य साथ मिळाली नाही आणि त्यांचा डाव १९ षटकात १३० धावातच आटोपला. अरिंजय लोखंडेने १६ धावांत ३ तर सौरीश देशपांडेने ९ धावांत २ बळी मिळवत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. संजीवनीच्या डावात सर्वाधिक ५९ धावा आणि दोन यष्टीचीत करणाऱ्या ओमकार पाटणकर याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. संजीवनी संघाने उपांत्य फेरीत टोटल वेंगसरकर अकादमीला १०१ धावांनी हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती तर आय.डी.बी.आय.फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर  अकादमी संघाने एम.आय.जी. संघावर ७ विकेटनी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

संक्षिप्त धावफलक : संजीवनी क्रिकेट अकादमी – २० षटकात ३ बाद १५३ ( ओमकार पाटणकर ५९, आदित्य बालीवडा ५५, निहार मगरे १८) वि.वि. आय.डी.बी.आय.फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर  अकादमी – १९ षटकात सर्वबाद १३० (तुषार सिंघ १८, आसिफ खान २२, यासीन सौदागर ४३; अरिंजय लोखंडे १६/३, सौरीश देशपांडे ९/२). सामनावीर – ओमकार पाटणकर .

टॅग्स :मुंबई