चेन्नई : ‘महेंद्रसिंग धोनी शानदार असून त्याचा क्रिकेटविश्वावर किती प्रभाव राहिला आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तो कदाचित आपल्या अखेरच्या आयपीएल सत्रात खेळत असेल. सर्वजण त्याचा आदर करतात आणि त्याचा तिरस्कार करण्यासाठी तुम्हाला राक्षसच बनावे लागेल,’ अशी प्रतिक्रिया गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने दिली. चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात यांच्यातील मंगळवारी झालेल्या पहिल्या क्वालिफायर लढतीआधी हार्दिकने धोनीबाबत मत मांडले.
सोशल मीडियावर गुजरात टायटन्सने पोस्ट केलेल्या व्हिडीओद्वारे हार्दिक म्हणाला की, ‘मी कायम महेंद्रसिंग धोनीचा समर्थक राहीन. इतक्या साऱ्या पाठीराख्यांसाठी आणि इतक्या साऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी तुम्हाला धोनीचा तिरस्कार करायचा असेल, तर यासाठी केवळ राक्षसच बनावे लागेल.’ मागच्या सत्राच्या तुलनेत धोनीने यंदा चेन्नई संघात बरेच बदल केले. यामुळे हा संघ पुन्हा एकदा चर्चेत आला. मागच्या सत्रात चेन्नईला दहा संघांतून नवव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. मात्र, यंदा चेन्नईने प्ले ऑफमध्ये धडक मारत पाचव्या जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
हार्दिकने धोनीविषयी पुढे सांगितले की, ‘खूपजण विचार करतात की, माही गंभीर स्वभावाचा आहे; पण असे नाही. आम्ही खूप मजामस्ती करतो. जाहीर आहे की, मी त्याच्याकडून खूप काही शिकलोय, अनेक सकारात्मक गोष्टी मी केवळ त्याच्याकडे पाहून शिकलोय. इतकेच काय, तर अधिक प्रमाणात न बोलणेही त्याच्याकडून शिकलोय.’ त्याचप्रमाणे, महेंद्रसिंग धोनी माझ्या भावासारखा असून मी त्याच्यासोबत मजामस्ती करू शकतो.