Join us  

क्रिकेट वर्ल्डकप जिंकायचा की हरायचा?

२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये वनडे विश्वचषक स्पर्धा झाली. साखळी फेरीत भारतीय संघाने वर्चस्व गाजवत गुणतालिकेत अव्वलस्थान पटाकवले. उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 3:12 AM

Open in App

- उमेश गो. जाधवउपसंपादक

मायदेशात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा प्रयत्न आहे. मात्र, २०१९च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यापासून आजपर्यंत भारताने काहीच धडा घेतलेला दिसत नाही. दोन-तीन वर्षांपासून संघात सातत्याने प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगांचा परिणाम असा झाला की विश्वचषक स्पर्धा अवघ्या दीड महिन्यांवर आलेली असतानाही भारताचा वनडे संघ अद्याप निश्चित नाही.

२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये वनडे विश्वचषक स्पर्धा झाली. साखळी फेरीत भारतीय संघाने वर्चस्व गाजवत गुणतालिकेत अव्वलस्थान पटाकवले. उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. २०१५मध्येही भारताला उपांत्य फेरीतच पराभूत व्हावे लागले होते. आता घरच्या मैदानावर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय संघ सज्ज होईल, असे वाटत होते; पण अजूनही संघात प्रयोगांचे सत्र सुरूच आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली या वरिष्ठ फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव, चाचपडणारे शुभमन गिल आणि इशान किशन, चौथ्या क्रमांकाची अडचण, तळातील फलंदाजांचे अपयश, वेगवान गोलंदाजांच्या फळीत सातत्याने होणारा फेरबदल आणि प्रयोगांवर दिला जाणारा भर यामुळे भारतीय संघ अजूनही स्थिरस्थावर नसल्याचे स्पष्ट दिसते. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात इशान किशनने तीन अर्धशतके झळकावली. मात्र, त्याचे शतकांमध्ये रुपांतर करण्यात तो अपयशी ठरला.

वनडे मालिकेत शुभमन गिल, सूर्यकुमार यादवला धावा करता आल्या नाहीत. गोलंदाजांनी धावा रोखल्या तरी फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका गमवावी लागली. श्रेयस अय्यर, लोकेश राहुल दुखापतीग्रस्त असल्याने चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाचा प्रश्न कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या दोघेही अपयशी ठरत आहेत. गोलंदाजीत मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी या दोघांवरच भार असेल. फिरकीपटूंमध्ये कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यावर मदार असेल.विश्वचषक स्पर्धेसाठी वेळ कमी आहे. भारताला आशियाई स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडून त्यातून विश्वचषकासाठी संघनिवडीची दिशा ठरवावी लागणार आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्ड
Open in App