हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत नोंदविलेल्या मोठ्या विजयाची पुनरावृत्ती करीत आज शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुस-या आणि अखेरच्या सामन्यात पुन्हा एकदा एकतर्फी विजय नोंदविण्यास भारतीय संघ सज्ज आहे. दुसरीकडे कामगिरीत सुधारणा करण्याच्या अपेक्षेसह पाहुणा संघ मैदानात पाय ठेवणार आहे.
राजकोटच्या पहिल्या सामन्यात भारताने एक डाव २७२ धावांनी तीन दिवसांत विजय संपादन केला. दुसºया सामन्यातही असेच चित्र राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर पूर्णपणे फिट नसून, त्यांचा एकमेव वेगवान गोलंदाज शेनन गॅब्रियल याचे खेळणेदेखील शंकास्पद आहे. भारताने पहिल्या सामन्यातील विजयी संघ या सामन्यातही कायम ठेवला.
आॅस्ट्रेलिया दौ-याआधी एकतर्फी मालिका भारताला परवडणारी नाही. याआधीही २०११ मध्ये भारताने विंडीजचा एकतर्फी मालिकेत २-० ने पराभव केला होता. त्यानंतर आॅस्ट्रेलिया दौºयात भारताला ०-४ ने पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.
२०१३ मध्येदेखील भारताने दोन्ही कसोटी सामने तीन दिवसांत जिंकले. त्यानंतर द.आफ्रिका दौºयात भारताने मालिका गमावली होती. यावरून निष्कर्ष निघतो की, विंडीज संघ मागील काही वर्षांत कडवा प्रतिस्पर्धी राहिलेला नाही. अशाप्रकारचे सामने वैयक्तिकरीत्या खेळाडूंसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देतात. याचा लाभ मागच्या सामन्यात पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी करीत घेतला होता. विशेषत: १८ वर्षांच्या पृथ्वी शॉचे शतक लक्षवेधी ठरले होते.
वेस्ट इंडिजच्या कमकुवत माºयाची तुलना एखाद्या प्रथमश्रेणी संघाशी होऊ शकेल. कमकुवत माºयापुढे भारतीय फलंदाज पुन्हा धावडोंगर उभारू शकतात. खेळपट्टीदेखील फलंदाजीला पूरक दिसते. भारतासाठी एकमेव चिंता म्हणजे अजिंक्य रहाणेचा फॉर्म. त्याने गेल्या १४ कसोटीत शतक ठोकले नाही.आॅस्ट्रेलिया दौºयाआधी त्याला सूर गवसणे आवश्यक आहे. लोकेश राहुलदेखील सतत अपयशी ठरत आहे, पण त्याला संघात ठेवले जात आहे. भारताला सलामी जोडी ‘सेट’ करण्यासाठी त्याला संघात ठेवणे गरजेचे आहे. शार्दुल ठाकूर पुन्हा १२ व्या खेळाडूच्या भूमिकेत असेल.
वेस्ट इंडिज भारतापुढे आव्हान सादर करण्याचा प्रयत्न नक्की करेल. त्यासाठी खेळपट्टीवर संयम राखून स्थिरावण्याचे धोरण अवलंबवावे लागेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.
वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील एम्ब्रिस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेज, शेन डोवरिच, शेनन गॅब्रियल, जहमर हॅमिल्टन, शिमरोन हेटमायर, शाय होप, अलझारी जोसेफ, कीमो पॉल, कीरेन पॉवेल, केमार रोच आणि जोमेल वारिकन.
सामन्याची वेळ :
सकाळी ९.३० पासून
Web Title: From today's second Test, India will be ready for a one-sided win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.