इंदूर : वेगवान तसेच फिरकी मा-याचा सुरेख संगम साधून पहिले दोन सामने जिंकणा-या भारतीय संघाने येथील होळकर स्टेडियमवर आज रविवारी पुन्हा आॅस्ट्रेलियाला धूळ चारून मालिका विजयासह नंबर वन होण्याचे लक्ष्य आखले आहे.
भारताने चेन्नईत पावसाच्या व्यत्ययात पहिला सामना डकवर्थ-लुईस नियमानुसार २६ धावांनी तसेच कमी धावसंख्या नोंदविल्यानंतर ईडनवर दुसरा सामना ५० धावांनी जिंकल्यानंतर तिस-या सामन्यातही पाहुण्यांना धक्का देत मालिका खिशात घालण्याचा कोहली अॅण्ड कंपनीचा इरादा आहे. होळकर स्टेडियम तसेही भारतासाठी ‘लकी’ आहे. येथे भारताने अद्याप नाणेफेकही गमावली नाही आणि सामनादेखील गमावला नाही.
हवामान मात्र भारताच्या मनसुब्यावर ‘पाणी फेरू’ शकते. येथे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या व्यत्ययाचा अंदाज वगळल्यास सर्वच बाबी भारतासाठी जमेच्या ठरत आहेत. आॅस्ट्रेलिया संघ कधीही मुसंडी मारून मालिकेत चुरस आणू शकतो, हे ध्यानात ठेवूनच आत्ममुग्ध न होता भारतीयांनी लढतीला सामोरे जायला हवे.
होळकर मैदानावर विजय मिळाल्यास वन-डेत भारत पुन्हा नंबर वन बनेल. कसोटीत नंबर वन असलेला भारतीय संघ द. आफ्रिकेपाठोपाठ वन-डेत सध्या दुसºया स्थानावर आहे. दोन्ही संघांचे ११९ गुण असून, भारताने सामना जिंकल्यास १२० गुण होतील. फलंदाजीत भारत संघाचा क्रम सरस आहे. त्याचवेळी गोलंदाजांनी सर्वांचे लक्ष वेधले. वन-डेत प्रथमच भारताकडे गोलंदाजीत इतकी विविधता पाहायला मिळत आहे. भुवनेश्वर, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या हे आॅस्ट्रेलियन फलंदाजांची सारखी परीक्षा घेताना दिसतात. स्टीव्ह स्मिथपुढे चहल आणि कुलदीप यांचे चेंडू खेळून काढणे हीच मुख्य डोकेदुखी आहे. ईडनवर त्याची प्रचिती आली होती. या दोघांना खेळायचे कसे, यावर अद्यापही पाहुण्या फलंदाजांना तोडगा काढता आलेला नाही.
इंदूरचा सामना मात्र मोठ्या धावसंख्येचा होईल, असे भाकीत क्युरेटर समंदरसिंग यांनी वर्तविले आहे. गोलंदाजांनादेखील सारखी संधी राहील. मनगटाचा वापर करणाºया फिरकी गोलंदाजांना अधिक ‘टर्न’ मिळेल, असे क्युरेटरचे मत आहे. आॅस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज डेव्हिड वॉर्नर याची बॅट अद्याप शांत असल्यामुळे व्यवस्थापनाची चिंता अधिकच वाढली. कर्णधार स्मिथ आत्मविश्वासाने खेळत असला तरी वेड आणि मॅक्सवेल यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. यामुळे तिसºया सामन्यात फलंदाजांचा क्रम बदलू शकतो. होळकर मैदानावर चारही वन-डे व एक कसोटी सामना भारताने जिंकला, हे विशेष. (वृत्तसंस्था)
उभय संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा.
आॅस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ कर्णधार), डेव्हिड वार्नर, ट्रेव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, पीटर हॅन्डस्कोम्ब, मार्कस् स्टोयनिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, अॅश्टन एगर, नाथन कूल्टर नाईल, केन रिचर्डसन, हिल्टन कार्टराईट, अॅरोन फिंच, जेम्स फॉल्कनर आणि अॅडम झम्पा .
सामना: दुपारी १.३० पासून
स्थळ: होळकर स्टेडियम, इंदूर
Web Title: Today's third one-day match: India's goal of winning the series, defeating Australia, is the number one chance to become number one
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.