Babar Azam, Bangladesh vs Pakistan: बांगलादेशच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये मंगळवारी मोठा उलटफेर केला. पहिल्या सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवल्यानंतर बांगलादेशच्या संघाने दुसरी कसोटीही जिंकली. पाकिस्तानने पहिल्या डावात २७४ तर बांगलादेशने २६२ धावा केल्या. अतिशय कमी धावांचा लीड घेऊन पाकिस्तानने दुसऱ्या डावात केवळ १७२ धावा केल्या. १८५ धावांचे आव्हान बांगलादेशने ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. यानंतर पाकिस्तानच्या संघावर टीका होत आहे. त्यातही प्रामुख्याने बाबर आझम टीकेचे लक्ष्य ठरत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष झका अश्रफ यांनी बाबर आझमबाबत मोठे विधान केले.
"मी पदावर असताना आम्ही टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या संघाचे कर्णधारपद बाबर आझमकडून काढून घेत शाहीन शाह आफ्रिदीकडे दिले होते. आम्ही तसा निर्णय घेतल्यानंतर त्याचा पाकिस्तानच्या संघावर कुठलाही नकारात्मक परिणाम झाला नव्हता. पाकिस्तानच्या संघातील एकता अजिबात कमी झाली नव्हती. उलट संघ आणखी चांगल्या पद्धतीने एकत्र आला होता. पण मी त्यावेळी बाबरला तोंडावर सांगितलं होतं की तू खेळाडू म्हणून सर्वोत्तम आहेस पण तुझी कप्तानी फालतू आहे. त्यानेही माझं म्हणणं मान्य केलं होतं," असे अश्रफ म्हणाले.
माझ्या कार्यकाळात मी शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूदला कर्णधार केले. शान मसूद खूपच उत्तम कर्णधार होता. सध्याही तो एक उत्तम खेळाडू म्हणून नावारुपाला येतोय. मी शाहीनला टी२०चा कर्णधार केला, तो माझा निर्णयदेखील योग्यच होता. बाबरच्या नेतृत्वशैलीवर शंका होती असे मला म्हणायचे नाही. पण बाबरला नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त करून फलंदाजीवर फोकस करायला वेळ मिळावा हा माझा हेतु होता," असेही झका अश्रफ यांनी अधोरेखित केले.