ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयाची मालिका अखेर रविवारी खंडित झाली. पण, पाकिस्तानचा संघ इतक्या वाईट पद्धतीनं टीम इंडियाला पराभूत करेल, असे कुणाच्या ध्यानी मनी ही नव्हतं. शाहिन शाह आफ्रिदीनं (Shaheen Shah Afridi) दिलेल्या धक्क्यातून विराट कोहली व रिषभ पंतनं टीम इंडियाला सावरलं. पण, खेळपट्टीचा रोख पाहता भारतीय गोलंदाजांना १५१ धावांचा बचाव करणं, सोपं नव्हतं. मात्र, त्यांन एकही विकेट घेता आली नाही ही खरी शोकांतिका ठरली. पाकिस्ताननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर पहिला विजय मिळवला. यानंतर पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने व्हिडीओ शेअर करत हरभजन सिंगला टोला लगावला.
"हरभजन सिंग वॉकओव्हर हवाय. नको, चला काय करु शकतो आपण. आता सहन करा," असं शोएब त्या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. यानंतर हरभजननही यावर पलटवार केला. "ठीक आहे, तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा. मी इकडेच आहे शोएब भाई. लवकरच क्रिकेटबाबत आपली पुन्हा एकदा चर्चा होईल," असं हरभजन म्हणाला.
बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही फॉर्मात असलेली जोडी टीम इंडियावर भारी पडली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही त्यांची ४ शतकी भागीदारी ठरली आणि त्यांनी शिखर धवन/रोहित शर्मा व केन विलियम्सन व मार्टिन गुप्तील यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. बाबर व रिझवान ही जोडी सातत्यानं चांगली कामगिरी करत होती आणि त्यांना लवकर बाद करणे भारतीय गोलंदाजांना जमलं नाही.