England vs Pakistan, 1st T20I : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) आपली ताकद दाखवण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात नव्यान दाखल होणाऱ्या टॉम बँटननं शुक्रवारी पाकिस्तानी गोलंदाजांना धु धु धुतले. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळला गेला. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली, परंतु त्यांचे चार फलंदाज 14 धावांवर माघारी पाठवून पाकिस्ताननं सामन्यात कमबॅक केलं होतं. पावसामुळे सामना रद्द झाला.
इंग्लंडचा ओपनर जॉनी बेअरस्टो ( 3) पहिल्याच षटकात माघारी परतला. त्यानंतर डीजे मलान आणि टॉम बँटन यांनी खेळपट्टीवर ठाण मांडले. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु एका चूकीनं ही जोडी फुटली. मलान 23 धावांवर धावबाद होऊन माघारी परतला. कर्णधार इयॉन मॉर्गननं 14 धावा करताना बँटनला साथ देण्याचा प्रयत्न केला, परंतु फिरकीपटू इफ्तिखर अहमदनं त्याला पायचीत केलं. त्यानंतर शाबाद खान आणि इमाद वासीन यांनी इंग्लंडला धक्के दिले. दरम्यान बँटनने 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 13व्या षटकात शाबाद खाननं त्याला बाद केलं. बँटनने 42 चेंडूंत 4 चौकार व 5 खणखणीत षटकार खेचून 71 धावा केल्या.
इंग्लंडच्या 16.1 षटकांत 6 बाद 131 धावा झाल्या असताना पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबला होता. पण, बँटनच्या खेळीनं कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात आनंदाचे वातावरण नक्की आले. डिसेंबर 2019 झालेल्या लिलावात KKRने त्याला 1 कोटीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. आता आयपीएलमध्येही तो KKRसाठी ओपनिंग करण्यासाठी सज्ज आहे. त्यानंही पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेल यांच्यासोबत खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. तो म्हणाला,'मागील हंगामात मी रसेलची फटकेबाजी पाहिली आणि त्याच्याकडून बरंच काही मला शिकायचं आहे.''