मुंबई : सध्या फलंदाजीची लय गमावून बसलेल्या कर्णधार केन विल्यमसनला सलामीला पाठवण्याच्या निर्णयाचे सनरायझर्स हैदराबाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मुडी यांनी समर्थन केले आहे. जर गोष्टी मनासारख्या होत नसतील तर चांगल्या निर्णयांमध्ये बदल का करायचा, असे मत त्यांनी याबाबत व्यक्त केले.
मुडी पुढे म्हणाले, 'संघातील इतर फलंदाज त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करतो आहे. शिवाय मार्करमसुद्धा स्पर्धेतल्या सर्वाधिक धावा करण्याऱ्या फलंदाजांमध्ये सामील असल्याने एकट्या विल्यमसनबाबत चर्चा करणे योग्य नाही. कारण गोष्टी जर मनासारख्या घडत नसतील तर अशावेळी तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे.'
कर्णधार केन विल्यमसनला आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये केवळ २०८ धावाच करता आल्या आहेत. त्याची सरासरीही फक्त १८.९२ इतकीच आहे. शनिवारीसुद्धा कोलकात्याविरुद्ध त्याला १७ चेंडूत ९ धावाच करता आल्या होत्या. याबाबत बोलताना मुडी पुढे म्हणाले, 'केनचा स्तर उच्च दर्जाचा असल्याने आम्हाला विश्वास आहे की तो लवकरच फॉर्ममध्ये येईल. तसेच संघातील इतर फलंदाज त्यांना दिलेल्या क्रमांकावर उत्तम कामगिरी करत असल्याने विल्यमसनचा फलंदाजातील क्रमांक बदलण्याची गरजच नाही.'
सलग पाच सामन्यात विजय मिळवून सनरायझर्सने प्ले ऑफची आपली दावेदारी मजबूत केली होती. मात्र त्यांना त्यानंतर सलग पाच सामन्यात पराभव पत्करावा लागला. संघासमोरील अडचणी वाढल्या.