नुकत्याच आटोपलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. दुर्दैवाने स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यात भारतीय संघाला अपयश आलं असलं तरी या स्पर्धेत भारतीय संघाने केलेली कामगिरी क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहणारी आहे. त्यात गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीने भेदक मारा करत अनेक सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली होती. दरम्यान, मोहम्मद शमीने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत एका धक्कादायक घटनेचा उलगडा केला आहे. कारकिर्दीत एक वेळ अशी आली होती की डॉक्टरांनी मला खेळण्याच मनाई केली होती, मला सातत्याने इंजेक्शन घ्यावी लागत होती, असे शमीने म्हटले आहे.
एका मुलाखतीमध्ये मोहम्मद शमीने केलेल्या या उलगड्याबाबत बऱ्याच क्रिकेटप्रेमींनी फारशी माहिती नाही आहे. शमी म्हणाला की, २०१५ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपूर्वी काही दिवस आधी माझ्या गुडघ्यांमध्ये सूज आली होती. अशा परिस्थितीत गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेणे हा माझ्यासमोरील शेवटचा पर्याय होता. मात्र मी शस्त्रक्रिया करून घेतली नाही आणि क्रिकेट खेळणं सुरू ठेवलं. प्रत्येक सामन्यानंतर मला रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घ्यावं लागत होतं. २०१५ च्या विश्वचषकापूर्वी कुणी अन्य खेळाडू असता तर तो खेळला नसता. मी वेदना झेलल्या आणि खेळत राहिलो. माझ्याकडे दोन पर्याय होते, पण मी विश्रांती घेण्याऐवजी देशाची निवड केली.
नंतर शमीच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली. शमी ही आठवण सांगताना म्हणाला की, मी दोन तास बेशुद्ध होतो. मात्र जेव्हा मला जाग आली तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं की, मी पुन्हा केव्हा खेळायला सुरुवात करू शकेन. त्यावर डॉक्टर म्हणाले की, क्रिकेट खेळणं दूर आहे. आता तुला आरामात चालता आलं तरी पुरेसं आहे. त्यानंतर सारं काही माझ्या रिकव्हरीवर अवलंबून होतं. असं शमीनं सांगितलं.