अहमदाबाद येथे वन डे वर्ल्ड कप फायनल गमावल्याच्या १९९ दिवसांनंतर प्रथमच रोहित शर्माने ( Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. इतके दिवस मनात दडवून ठेवलेल्या वेदना त्याने पहिल्यांदाच उघड केल्या. २०१३ नंतर भारतीय संघ पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धा जिंकण्याच्या अगदी नजीक पोहोचला होता, परंतु स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ फायनलमध्ये हरला. त्या दारुण पराभवाची व्यथा रोहितने व्यक्त केली आहे.
अंतिम सामन्यातील पराभवानंतर सर्व कॅमेरे रोहितवर होते. त्याचे डोळे भरून आले होते. तो म्हणाला, फायनलपूर्वी असा विचार कोणीही केला नव्हता. आपण इतके चांगले क्रिकेट खेळतोय, पुढे जाऊ, असे सर्वांना वाटत होते. पराभवानंतर मला मैदानावर राहायची इच्छा नव्हती. खूप वाईट वाटत होतं. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल, पण ती मिळत नसेल, तर तुमची चिडचिड होते, तुम्ही निराश होता आणि रागावता. मनात वाईट विचार येऊ लागतात. तेव्हा माझ्या आयुष्यात काय घडतंय हेच कळत नव्हतं. मला फक्त घरी जायचे होते. दुसऱ्या दिवशी मला जाग आली तेव्हा काल रात्री काय झालं ते कळलंच नाही.
दरम्यान, अमेरिकेत खेळल्या गेलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडवर विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून विक्रम नावावर केले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ४००० धावांचा टप्पा ओलांडला आणि विराट कोहली ( ४०३८) व बाबर आजम ( ४०२३) यांच्या पंक्तित स्थान पटकावले.
पण, रोहितने सर्वात कमी म्हणजेच २८६० चेंडूंचा सामना करताना हा पराक्रम केला आणि विराट ( २९०० चेंडू) व बाबर ( ३०७९) यांना मागे टाकले. पण, इनिंग्जमध्ये विराट ( १०७) व बाबर ( ११२) हे रोहितच्या ( १४४) पुढे आहेत. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये ४००० हून अधिक धावा नाववर असलेले रोहित व विराट हे जगातील दोनच फलंदाज आहेत. रोहितने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० षटकार मारणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये १००० हून अधिक धावांचा विक्रमही रोहितने नावावर केला आणि विराट कोहली ( ११४२) व माहेला जयवर्धने ( १०१६) यांच्या पंक्तित स्थान पटकावले.