प्रमुख फलंदाजांचे अपयश चिंतेचा विषय

अखेर टी-२० तिरंगी मालिकेत भारताने श्रीलंकेविरुद्ध सहज विजयाची नोंद केली. पण, माझ्या मते जर का श्रीलंकेच्या फलंदाजांनी संयम गमावला नसता, तर हा सामना अटीतटीचा झाला असता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 04:34 AM2018-03-14T04:34:09+5:302018-03-14T04:34:09+5:30

whatsapp join usJoin us
Top batsmen's failure is a matter of concern | प्रमुख फलंदाजांचे अपयश चिंतेचा विषय

प्रमुख फलंदाजांचे अपयश चिंतेचा विषय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन
अखेर टी-२० तिरंगी मालिकेत भारताने श्रीलंकेविरुद्ध सहज विजयाची नोंद केली. पण, माझ्या मते जर का श्रीलंकेच्या फलंदाजांनी संयम गमावला नसता, तर हा सामना अटीतटीचा झाला असता. कारण एक वेळ अशी होती, जेव्हा श्रीलंकेने ३ फलंदाजांच्या मोबदल्यात ११०-११२ धावांची मजल मारलेली, शिवाय षटकेही खूप शिल्लक होती. त्यामुळे यजमान सहजपणे १७० - १८० धावा उभारतील असे वाटत होते, पण असे झाले नाही. जर का असे झाले असते, तर मात्र भारतासाठी हा विजय मिळवणे काहीसे कठीण गेले असते. कारण धावांचा पाठलाग करताना ज्या प्रकारे भारताने फलंदाज गमावले ते दिलासादायक नव्हते. रोहित शर्मा, सुरेश रैना आणि लोकेश राहुल यांना अपेक्षित धावा करता आल्या नाहीत. रोहित आपला फॉर्म मिळवण्यासाठी झगडतोय, तर रैना आणि राहुल संघातील स्थान कायम राखण्यासाठी झुंजत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुमच्यासमोर सोपे आव्हान असते, तेव्हा संघाला विजयी करण्यासोबतच वैयक्तिक मोठी खेळी करण्याची जबाबदारीही फलंदाजांवर असते. निवडकर्त्यांना तुमच्या पुनरागमनाचा विश्वास मिळवून देण्याची संधी या वेळी प्रमुख फलंदाजांकडे होती. रोहित शर्माकडून कॅप्टन इनिंग्जची अपेक्षा होती. या गोष्टींचा अपवाद वगळता संघाने मिळवलेला विजय चांगला होता. त्यामुळे या मालिकेत अंतिम फेरीतील भारताचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे.
वैयक्तिक कामगिरीबाबतीत सांगायचे म्हणजे, की मी शार्दुल ठाकूरच्या प्रदर्शनाने खूप प्रभावित झालो आहे. त्याच्यासोबत वॉशिंग्टन सुंदरनेही लक्ष वेधले आहे. माझ्या मते त्यांच्यामुळेच भारताने सामन्यात पुनरागमन केले. शार्दुलने त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये चांगला मारा करताना तळाच्या फलंदाजांना गुंडाळले. ही कामगिरीही अत्यंत महत्त्वाची असते, कारण जर का या वेळी १०-१२ धावा जास्त दिल्या असत्या तर सामना भारतासाठी अडचणीचा ठरला असता. वॉशिंग्टनने आपली परिपक्वता दाखवून दिली आहे. त्याशिवाय मनीष पांडेनेही लक्ष वेधले. त्याने चांगली खेळी केली. पण मोठ्या कालावधीपासून त्याचेही संघातील स्थान निश्चित झालेले नाही. या सामन्यातून मनीषने चांगल्या प्रकारे स्वत:ला सिद्ध केले आहे. दिनेश कार्तिकने वयाची तिशी पार केल्यानंतरही आपली चमक दाखविली. अनेकांच्या मते त्याच्याऐवजी युवा खेळाडूंना संधी द्यावी. पण ऋषभ पंतने मिळालेल्या संधीचा फायदा उचलला नाही आणि दिनेशने पूर्ण फायदा उचलत आपली छाप पाडली. मनीष - दिनेश यांची भागीदारी विजयी ठरलीच, त्याचबरोबर त्यांनी इतर फलंदाजांनाही भागीदारी कशी रचावी, याचा धडा दिला. लक्ष्य समोर ठेवून आणि शांत डोक्याने फलंदाजी करीत संघाला विजयी करणे, हा संदेश त्यांनी दिला आहे.

(संपादकीय सल्लागार)

Web Title: Top batsmen's failure is a matter of concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.