२०१९चा वर्ल्ड कप आठवतोय...बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या... भारत-पाकिस्तान मॅच पावसामुळे रंगतदार झाली... फायनलमध्ये तर कमालच झाली... वन डे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक चौकार मारलेला संघ वर्ल्ड कप विजेता ठरला... आता २०२३ चा वन डे वर्ल्ड कप अवघ्या ७ दिवसांवर आलाय आणि त्यातही अशाच नाट्यमय, चुरशीच्या घडामोडी पाहायला मिळतील... २०१९ मध्ये शुबमन गिल हे नाव जर कुणी विचारले असते तर १९ वर्षांखालील भारताचा वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू एवढंच सांगता आला असतं, पण आता गिल हा एक ब्रँड झाला आहे. मागील वर्षभरात त्याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत केलेली दैदिप्यमान कामगिरी अनेकांना धडकी भरवणारी आहे. विराट कोहलीशी नेहमी तुलना होत असलेल्या बाबर आजमही आता शुबमन गिलच्या टप्प्यात आला आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानचा कर्णधार सावध झालाय...
शुबमन हा २०२३ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये १२३० धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. त्याच्या आसपास संयुक्त अरब अमेरिकेचा आसीफ खान आहे, ज्याच्या धावा ९३४ इतक्या आहेत. म्हणजे विचार करा शुबमनने मिळालेली संधी कशी दोन्ही हाताने घट्ट पकडली आहे. आता त्याच्या फॉर्माची धास्ती बाबर आजमला वाटतेय... आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आजम सध्या नंबर १ आहे, परंतु शुबमन केव्हाही हे ताज त्याच्याकडून हिसकावून घेऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात शुबमनला विश्रांती दिली नसती तर तो नंबर १ फलंदाज म्हणून वर्ल्ड कप स्पर्धेत उतरला असता. त्याने पहिल्या दोन सामन्यांत १७८ धावा चोपल्या आणि मॅन ऑफ दी सीरिजचा मान त्याला मिळाला.
बाबर आजम ८५७ रेटींग पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे आणि शुबमन ८४७ पॉईंट्सनेच अव्वल स्थानापासून दूर आहे. हा १० गुणांचा फरक शुबमन ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत दमदार खेळ करून सहज पार करू शकतो. म्हणून आता बाबरही सावध झाला आहे आणि त्याने वर्ल्ड कप गाजवण्याचा निर्धार केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन ( ७४३) तिसऱ्या, आयर्लंडचा हॅरी हेक्टर ( ७२९) चौथ्या आणि पाकिस्तानचा इमाम-उल-हक ( ७२८) पाचव्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यरानेही ८ स्थानांच्या सुधारणेसह ३०वे आणि लोकेशने ६ स्थानांच्या सुधारणेसह ३३वे स्थान पटकावले आहे.