Hardik Pandya ruled out ICC ODI World Cup : भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत धुमाकूळ घालतोय... भारताने सलग ७ विजय मिळवून उपांत्य फेरीतील जागा पक्की केली. पण, उपांत्य फेरीचा सामना खेळण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला उर्वरित वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याचा पाय मुरगळला आणि त्यातून तो अजूनही पूर्णपणे नाही सावरला. त्यामुळे ३० वर्षीय खेळाडूला माघआर घ्यावी लागत असल्याचे आयसीसीने जाहीर केले.
हार्दिकच्या जागी टीम इंडियात जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याची निवड केली गेली आहे. स्पर्धेच्या तांत्रिक समितीने प्रसिद्धच्या नावाला मान्यता दिली आहे. प्रसिद्धने केवळ १९ वन डे सामने खेळलेले आहेत. त्याच्या नावावर ३३ आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. पण, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांच्या उपस्थितीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका हे अव्वल दोन स्थानांवर आहेत आणि त्यांच्यात रविवारी लढत होणार आहे. या सामन्यासाठी प्रसिद्ध उपलब्ध असेल.
दरम्यान, स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेल्या हार्दिक पांड्याने भानविक पोस्ट केलीय.. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उर्वरित टप्प्यातून माघार घ्यावी लागतेय, हे पचवणे अवघड आहे. मी नेहमी संघासोबत आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक सामन्यात मी चिअर करेल. तुम्हा सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा, प्रेम आणि दाखवलेला पाठींबा अविश्वसनीय आहे, सर्वांचे आभार. हा संघ खास आहे आणि तुम्हा सर्वांना अभिमान वाटेल अशी तो कामगिरी करेल, याची मला खात्री आहे, असे हार्दिकने ट्विट केले.