मुंबई, दि. 13 - श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय मालिका आणि एकमेव टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माकडे उपकर्णधारपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत. याशिवाय पालघरच्या शार्दूल ठाकूरचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे जूनमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपासून दूर राहिलेला के. एल. राहुल याचे पुनरागमन झाले आहे. हा 25 वर्षीय फलंदाज जानेवारीनंतर एकही वनडे खेळलेला नाही.
या मालिकेसाठी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसंच युवराज सिंगला या संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. युवराजला विश्रांती दिली आहे की त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्याच्याजागी मनिष पांडेची या संघात वर्णी लागली आहे. युवराज सिंगने गेल्या 6 वनडे सामन्यांमध्ये फक्त 109 धावा केल्या होत्या. ३५ वर्षीय युवराज सिंगने जूनमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानविरुद्ध ३२ चेंडूंत ५३ धावा केल्या होत्या. परंतु, त्यानंतर तीन डावांमध्ये त्याने केवळ ७, २३ नाबाद आणि २२ धावा केल्या होत्या. त्यानंतर तो वेस्ट इंडीजविरुद्ध पाच वनडे सामने खेळला होता. यात त्याचा ३९ धावांचा सर्वोच्च स्कोअर होता.
कसोटी मालिका संपल्यानंतर 20 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. 15 सदस्यीस संघात फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे, तर जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकुर यांच्यावर जलदगती गोलंदाजीची धुरा असणार आहे. श्रीलंकेमध्ये भारत 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे. 20 ऑगस्ट रोजी डम्बुल्ला येथे पहिला वन डे सामना होणार आहे.
श्रीलंका दौ-यासाठी भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, मनिष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, एम एस धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर
Web Title: Touring Sri Lanka; Declared squad for ODI Twenty20, Rohit Sharma's vice-captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.