नवी दिल्ली : भारतीय संघाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये शानदार फलंदाजी करून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) संघाचा सलामीचा चेहरा म्हणून त्याची ओळख आहे. सध्या ऋतुराज गायकवाड खूप चर्चेत आहे कारण त्याने अलीकडेच बीसीसीआयच्या एका व्हिडीओमध्ये काही मजेशीर आणि कठीण प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
धोनीसोबत ट्रेनिंग करायचे की सचिनसोबत डिनर?दरम्यान, या मुलाखतीत ऋतुराजला विचारण्यात आले की एम.एस धोनीसोबत ट्रेनिंग करायचे की सचिन तेंडुलकरसोबत डिनर? या प्रश्नाचे ऋतुराजने अत्यंत काळजीपूर्वक उत्तर दिले. तो म्हणाला, "महेंद्रसिंग धोनीसोबत पहिले ट्रेनिंग सेशन आणि नंतर सचिन तेंडुलकरसोबत डिनर." ऋतुराजने या व्हिडिओमध्ये खुलासा केला की, तो क्रिकेटर नसता तर टेनिस खेळत असता.
टेनिसबद्दल भाष्य करताना त्याला विचारणा करण्यात आले की तुला कोणाचे प्रशिक्षण घ्यायला आवडेल, नोव्हाक जोकोविच की राफेल नदाल? यावर २५ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूने या दोघांपैकी कोणाचेही नाव घेतले नाही. त्याने प्रत्युत्तरात रॉजर फेडररचे नाव घेतले. तसेच आवडत्या क्रिकेटरच्या प्रश्नावर त्याने सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तीन खेळाडूंची नावे घेतली.
ऋतुराज गायकवाडने ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रभावशाली लिस्ट ए रेकॉर्ड असूनही ऋतुराजला अद्याप एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करता आलेले नाही. ६४ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने एकूण ३,२८४ धावा केल्या आहेत आणि या काळात त्याची सरासरी ५४.७३ अशी राहिली आहे.