बंगळुरू : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. मात्र भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही हे बीसीसीआय ठरवत नसून सरकार ठरवत असते असे बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानला जायचं की नाही ते सरकार ठरवते - बिन्नी बंगळुरू येथे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बिन्नी म्हणाले की, बीसीसीआयने पुढील वर्षी पाकिस्तान दौर्याबाबत अद्याप सरकारशी संपर्क साधला नाही, परंतु अखेरीस केंद्र सरकार या प्रकरणावर निर्णय घेईल. "हा बीसीसीआयचा कॉल नाही. आम्हाला देश सोडण्यासाठी सरकारची मंजुरी हवी असते. आम्ही आपला देश सोडतो किंवा विदेशी संघ देशात येतो, यासाठी भारत सरकारची परवानगी आवश्यक असते. एकदा आम्हाला सरकारकडून मंजुरी मिळाली की आम्ही त्याबाबतीत निर्णय घेऊ, आम्ही स्वतः याबाबत कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. आम्हाला सरकारवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पाकिस्तानला जायचे की नाही यावर आम्ही अद्याप त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही," असे रॉजर बिन्नी यांनी सांगितले.
PCBची BCCIवर टीका भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषकाची स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुढील वर्षी आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही आणि त्याऐवजी तटस्थ ठिकाणी स्पर्धा खेळवावी अशी मागणी केली होती. या मागणीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लांबलचक पत्रक काढून बीसीसीआयवर टीका केली होती. तसेच आम्ही विश्वचषकावर बहिष्कार टाकू अशी धमकी देखील पीसीबीने दिली आहे.
याबाबत गुरुवारी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, "भारतीय संघाला पाकिस्तानला जाण्यासाठी गृह मंत्रालयाकडून मंजुरी आवश्यक असते." मात्र हतबल झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी आशियाई क्रिकेट परिषदेला तातडीची बैठक बोलावण्याची विनंती केली. शाह यांच्या टिप्पणीचा संदर्भ देताना, पीसीबीने म्हटले होते की "अशा विधानांमुळे आशियाई आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायाला त्रास होऊ शकतो. तसेच 2023 च्या विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या भारत दौऱ्यावर याचा परिणाम होऊ शकतो.
2008 पासून भारताने संबंध तोडलेखरं तर 2008 च्या आशिया चषकापासून भारतीय संघ एकदाही पाकिस्तानला गेला नाही. त्याच वर्षी 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 2009 च्या सुरुवातीला नियोजित द्विपक्षीय मालिका रद्द करण्यात आली होती. मुंबईवरील दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने शेजाऱ्यांशी संबंध तोडले. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"