नवी दिल्ली : भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने आपल्या संघाला काही दिवसांपूर्वी संमती दिली. त्याचवेळी पाकिस्तान सरकारने भारतात विशेष सुरक्षा पुरविण्याची मागणी केली होती. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पाकिस्तान संघाला कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये पाकिस्तान टी-२० विश्वचषकासाठी भारतात आला होता. आता ७ वर्षांनंतर भारतात येत आहे.
विश्वचषकात पाकिस्तान संघ पाच शहरांमध्ये सामने खेळणार आहे. त्यात हैदराबाद, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यांचा समावेश आहे. एएनआयशी बोलताना भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान क्रिकेट संघाला विशेष वागणूक मिळणार नाही. अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, पाकिस्तान संघाला कोणतीही विशेष वागणूक दिली जाणार नाही. पाकिस्तानचा संघ आमच्यासाठी इतर संघांइतकाच महत्त्वाचा आहे. सुरक्षिततेच्या समस्यांबाबत आमच्या सुरक्षा संस्था आणि आयोजकांना विचारले पाहिजे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या संघाला भारतात खेळण्यास मान्यता दिली त्यावेळी ते म्हणाले होते की, आम्हाला राजकारण आणि खेळ एकत्र आणायचे नाही. त्यामुळे आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही आमचा क्रिकेट संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.