वेलिंग्टन : न्यूझीलंडने बांगलादेशचा येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात तब्बल १६४ धावांनी पराभव करीत मालिका ३-० ने जिंकली. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सामन्यात टिपलेला झेल कौतुकाचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी बोल्टच्या या कामगिरीची चांगलीच दखल घेतली. बोल्टने एकहाती झेल टिपत सर्वांना थक्क केले. हा झेल इतका जबरदस्त होता की, आयसीसीनेही बोल्टचा व्हिडिओ शेअर करीत त्याचे अभिनंदन केले आहे.
बोल्टने लिटन दासचा झेल टिपला. बांगलादेशच्या फलंदाजीच्या सातव्या षटकात मॅट हेन्री गोलंदाजी करीत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर लिटन दासने मारलेला फटका थर्ड मॅनच्या दिशेला गेला. तिथे क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेल्या बोल्टने सूर मारत हा झेल टिपला. लिटनला २१ धावांवर माघारी परतावे लागले. गोलंदाजीबरोबरच बोल्ट क्षेत्ररक्षणातही मातब्बर मानला जातो. आयपीएलमध्येही त्याने दमदार क्षेत्ररक्षण केले आहे.
डेव्होन कॉनवे (१२६) आणि डॅरेल मिशेल (नाबाद १००) यांच्या धडकेबाज फलंदाजीपाठोपाठ जेम्स नीशामच्या (५/२७) भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने तिसऱ्या सामन्यात बांगलादेशला १६४ धावांनी पराभूत केले. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. कॉनवे आणि मिशेल यांनी विक्रमी १५९ धावांची भागीदारी केल्याने न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशविरुद्ध ५० षटकात ६ बाद ३१८ धावा उभारल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव ४२.४ षटकांत १५४ धावांत आटोपला. बांगलादेशकडून महमदुल्लाने सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा फटकावल्या. डेव्होन कॉनवेला सामनावीर आणि मालिकावीर अशा दोन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.