न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा भेदक यॉर्कर टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याची एक वेगळीच दहशत आहे. पण नुकत्याच झालेल्या एका सामन्यात त्याने शेवटच्या षटकात चेंडूने नव्हे तर बॅटच्या जोरावर आपल्या संघाला धडाकेबाज विजय मिळवून दिली. ड्रीम ११ सुपर स्मॅश स्पर्धेत सुरू असलेल्या एका सामन्यात त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत नॉर्दन नाईट्स संघाला मोठा विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कँटनबरी संघाने १७.२ षटकांत १०७ धावा केल्या आणि त्यांचा संपूर्ण संघ बाद झाला. त्यानंतर १०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाईट्स संघ १२.२ षटकात ३ बाद ७२ धावा अशा मजबूत स्थितीत होता. नाईट्स संघ कँटनबरीने दिलेलं आव्हान सहज पार करेल असं वाटत होतं. पण अचानक नाईट्स संघाचे गडी एकापाठोपाठ एक बाद होत केले. त्यामुळे त्यांची धावसंख्या १९.२ षटकात १०० धावा अशी झाली होती. शेवटच्या चार चेंडूत ८ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बोल्टने एक धाव घेतली तर चौथ्या चेंडूवर इश सोढी झेल देऊन माघारी परतला. पाचव्या चेंडूवर क्लार्कने पुन्हा एक धाव घेतली. त्यामुळे नाईट्स संघाला एका चेंडूत सहा धावांची गरज होती. नेमका त्याच वेळी बोल्टने दमदार षटकार लगावत संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला.
एड नटेलने ट्रेंट बोल्टला आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. या चेंडूसाठी बोल्ट तयार होता. त्यामुळे त्याने तो चेंडू हवेत टोलवला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने थेट मैदानातून बाहेर गेला आणि बोल्टला सहा धावा मिळाल्या. बोल्टच्या या षटकाराच्या बळावर नाईट्स संघाने थरारक विजय मिळवला.